अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकारणाबद्दलही तिची मतं मांडत असते. बऱ्याचदा राजकीय घटनांबाबत ती प्रतिक्रियाही देते. त्यामुळे तिला राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलंय.
“राजकारण राजा महाराजांच्या काळापासून चालत आहे. राजकारण कुटील आहे, पण तशी व्यक्ती नाही. मी मनाने स्वच्छ आहे. मी कलाकार आहे, त्यामुळे कलेशी कायम जोडलेलं राहावं, अशी माझी इच्छा आहे. पण मला तशी जबाबदारी देण्यात आली किंवा मी देशासाठी काही करावं, असं मला वाटलं, वैयक्तिक आयुष्य सोडून मी देशाचा विचार केला आणि देशाला माझी गरज असेल तर मी नक्कीच राजकारणात येईन,” असं कंगना रणौत म्हणाली.
यावेळी बोलताना कंगनाने मुंबईतील तिच्या घरावर बीएमसीने केलेल्या कारवाईबद्दलही भाष्य केलं. आपल्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही व आता नुकसान भरपाई नको, असं तिने म्हटलं आहे. नुकसान भरपाईतून मिळणारा पैसा हा देशातील सामान्य करदात्यांचा होता, त्यामुळे तो पैसा आपल्याला नको, असं कंगना त्या कारवाईबद्दल म्हणाली.