scorecardresearch

‘पठाण’चे गुणगान गाणाऱ्या बॉलिवूडवर कंगना रणौत भडकली; ट्वीटमध्ये म्हणाली, “राजकारणापासून…”

पठाण चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF Chapter-2 चा रेकॉर्डही मोडला आहे

kangana pathaan
फोटो : इंडियन एक्सप्रेस

सध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २४ कोटींपेक्षा अधिक कमाई केली असल्याची चर्चा आहे. शिवाय पहिल्याच दिवशी तब्बल ५० कोटीपेक्षा जास्त कमाई करत याने बरेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये आणखीनही बरेच रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा होत आहे. काहीच दिवसांपूर्वीच ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यावर अभिनेत्री कंगना रणौतने रोखठोक मतं द्यायला सुरुवात केली आहे.

अशातच‘पठाण’ची हवा असताना कंगना रणौतने केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरलं. कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं की “चित्रपटसृष्टी इतकी मुर्ख आहे की, कोणताही केलेला प्रयत्न, निर्मिती किंवा कला किती यशस्वी ठरली हे सांगण्यासाठी फक्त किती रुपये कमावले हे दाखवलं जातं. कलेचा दुसरा काहीच हेतू नाही असं भासवलं जातं. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे? हे यामधून दिसून येतं.” असं म्हणत कंगनाने अप्रत्यक्षरित्या ‘पठाण’वरच निशाणा साधला आहे.

आणखी वाचा : ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या वादावर ए आर रेहमान यांचं परखड मत; दिग्दर्शकाची बाजू घेत म्हणाले…

आता पुन्हा कंगनाने ‘पठाण’चे गुणगान करणाऱ्या सोशल मीडियावरील चाहत्यांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर ‘पठाण’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे ‘द्वेषावर मिळवलेला विजय’ असं काही लोक चित्र उभं करत आहेत, त्यांच्यावरच कंगना भडकली आहे. कंगना याबद्दल ट्वीट करत म्हणाली, “बॉलिवूडमधील लोकांनो तुम्ही हिंदू द्वेषाचे बळी ठरले आहात हे चित्र उभं करायचा प्रयत्न करू नका. ‘द्वेषावर मिळवलेला विजय’ हा शब्द माझ्या पुन्हा कानावर पडला तर तुमची मी चांगलीच शाळा घेईन. चांगलं काम करा आणि मिळालेल्या यशाचा आस्वाद घ्या, राजकारणापासून लांब रहा.”

ट्विटरवर पुन्हा आल्यापासून कंगना अशी रोखठोक ट्वीट करतच आहे. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी १०० कोटीची विक्रमी कमाई केली आहे. सगळीकडेच शाहरुखच्या या चित्रपटाची हवा आहे. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF Chapter-2 चा रेकॉर्डही मोडला आहे. पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफ २ हा चित्रपट होता. पण पठाणने या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. KGF Chapter 2 या चित्रपटाला मागे टाकत पठाणने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:51 IST
ताज्या बातम्या