Kareena Kapoor Glowing Skin Secret: करीना कपूर खान ४५ वर्षांची आहे. ती खूपच सुंदर दिसते. तिची त्वचा तजेलदार आहे. तसेच ती फिट आहे. दोन मुलांची आई असलेली करीना कपूर निरोगी राहण्यासाठी काय करते, तिचा डाएट प्लॅन काय आहे, त्वचा तजेलदार राहण्यासाठी करीना काय करते, ते जाणून घेऊयात.

करीनाला रात्री लवकर जेवण करून रात्री ९:३० च्या सुमारास झोपणं आवडतं. त्यामुळे ती अनेकदा पार्ट्यांना जाणं टाळते. “माझ्या मैत्रिणींना माहित आहे की पार्ट्यांमध्ये माझी वाट पाहायची नाही. ते माझ्या या सवयीचा आदर करतात. त्यांना माहिती आहे की मी कमी आवाजात ‘शिट्स क्रीक’ पाहत असते,” असं करीना कपूर म्हणाली.

करीना बऱ्याच काळापासून आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्याकडून डाएट प्लॅन घेतेय. करीना नुकताच खुलासा केला की ती दर २-३ दिवसांनी खिचडी खाते, नाहीतर तिला रात्री झोप येत नाही. “खिचडी माझं कंफर्ट फूड आहे. मी २-३ दिवस खिचडी खाल्ली नाही तर मला करमत नाही. मी रुजुताला मेसेज करते की माझ्या डाएटमध्ये खिचडी नसेल, तर मला रात्री झोप येत नाही,” असं करीना कपूरने नमूद केलं.

करीना कपूरचा डाएट प्लॅन

द लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत, रुजुताने करीना कपूरच्या डाएटबद्दल सांगितलं होतं. “करीना कपूर सकाळी उठताच बदाम मनुका किंवा अंजीर असे ड्रायफ्रुट्स खाते. नाश्त्यात ती पराठा किंवा पोहे, दुपारच्या जेवणात डाळ आणि भात आणि संध्याकाळी नाश्त्यात चीज टोस्ट (कधीकधी) किंवा मँगो शेक (सिझनल); आणि रात्रीच्या जेवणात तूप घालून खिचडी किंवा पुलाव खाते,” असं रुजुता दिवेकर म्हणाली.

करीनाच्या मते, शाकाहारी झाल्यामुळे तिची त्वचा आणि शरीरात बरेच बदल झाले आहेत. बोटॉक्स आणि फिलरसारख्या प्रक्रियांपेक्षा करीनाचा नेहमीच नैसर्गिकरित्या वय वाढण्यावर विश्वास आहे. करीनाला योग, व्यायाम करायला आवडतं. “मला स्कीन ट्रिटमेंट आणि बोटॉक्सपेक्षा स्ट्रेंथ ट्रेनिंग, थोडं चालणं, सूर्यनमस्कार आणि स्वतः छोटी कामं करणं जास्त आवडतं,” असं करीना कपूर सांगते.

करीना कपूरला आवडतं घरचं जेवण

करीनाने सांगितलं की तिने जगभरातील विविध ठिकाणच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे, पण तिला घरी बनवलेलं जेवण सर्वात जास्त आवडतं. करीना म्हणाली, “मी ते सर्व खाल्ले आहे, पण मला ते आवडत नाही. जेव्हा मी घरी असते आणि घरी बनलेलं साधं अन्न जेवते तेव्हा मला खूप भारी वाटतं. मी स्वतःला नशीबवान समजते. दिवसभराच्या कठोर परिश्रमानंतर घरी बनवलेलं जेवणं मिळणं याहून मोठं सुख काही नाही. आता तर सैफ आणि मी स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे.”