प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांनी ९०च्या काळात अनेकांना वेड लावलं होतं. आजही त्यांच्या गाण्यांची क्रेझ कमी झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पिढीतील लोकांना त्यांची गाणी आजही आपलीशी वाटतात. किशोर कुमार हे फक्त गायकच नव्हते तर ते एक अभिनेतेसुद्धा होते. त्यांनी ‘पडोसन’, ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘शराबी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

अशातच किशोर कुमार यांच्या मुलाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी विकी लालवानीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही भाष्य केलं आहे. किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केलं असून त्यांच्या पहिल्या पत्नी रुमा गुहा ठाकुरता होत्या. अमित कुमार रुमा व किशोर यांचा मुलगा. अमित कुमारच्या आई रुमा यांच्यानंतर किशोर कुमार यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाबरोबर लग्न केलं. अमितने विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधुबाला यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.

विकी लालवानीने अमित कुमार यांना त्यांचे वडील किशोर कुमार व सावत्र आई मधुबाला यांच्याबद्दल प्रश्न विचारला असताना अमित कुमार किस्सा सांगत म्हणाले, “मी मधुबाला यांना मम्मी अशी हाक मारायचो. त्यांच्याबरोबर राहिलोही आहे. मला झोपेत लाथ मारण्याची सवय होती. आम्ही तिघे एकत्र झोपत असू, तेव्हा झोपेत नकळत खूपदा त्यांना माझा पाय लागत असे. तेव्हा त्या माझ्या वडिलांना सांगायच्या की तुमचा मुलगा खूप लाथा मारतो.”

अमित कुमार यांनी यासह त्यांच्या वडिलांबरोबरच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “मला माझ्या दोन्ही पालकांकडून प्रेम मिळालं. मी सुट्टयांच्यावेळी मुंबईत येत असे, मला इथे येणं प्रचंड आवडायचं. मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी उत्सुक असायचो. तेसुद्धा मला भेटण्यासाठी कोलकातामध्ये येत असत.” पुढे वडिलांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना ते म्हणाले, “माझ्या आईपासून विभक्त झाल्यानंतर वडिलांनी केलेल्या तीन लग्नांच्या विरोधात मी नव्हतो. खरंतर माझी आई रुमा व सावत्र आई लीना चंदावरकर या दोघी १२ वर्ष एकाच घरात एकत्र राहिल्या आहेत. आम्ही एकत्र बसून जेवत असू. ते सगळे पुढारलेल्या विचारांचे होते. माझं माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम होतं. मला त्यांची खूप आठवण येते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, किशोर कुमार यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं, तर किशोर कुमार यांनी एकून चार वेळा लग्न केलं होतं. त्यांचं पहिलं लग्न रुमा गुहा ठाकुरता यांच्यासह झालं होतं. रुमा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्याबरोबर १९६० साली दुसरं लग्न केलं. मधुबाला यांच्या मृत्यूनंतर किशोर यांनी योगिता बाली यांच्यासह १९७६ साली लग्न केलं. हे त्यांचं तिसरं लग्न होतं. यानंतर त्यांनी १९८० साली अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्यासह लग्न केलं. त्यावेळी लीना यांचं वय वर्ष ३० होतं तर किशोर कुमार ५१ वर्षांचे होते. या दोघांनी सात वर्ष संसार केला. त्यांना सुमित कुमार नावाचा मुलगा आहे. पुढे १३ ऑक्टोबर १९८७ मध्ये किशोर कुमार यांचं निधन झालं.