Mahavatar Narsimha Box Office Collection : अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’ या पौराणिक ॲनिमेटेड चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाने एकामागून एक अनेक विक्रम मोडले आहेत. प्रदर्शनाच्या ५ आठवड्यांनंतरही ‘महावतार नरसिम्हा’चा बॉक्स ऑफिसवरील जादू कायम आहे.
‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या ३५व्या दिवशी, गुरुवारी, भारतात या चित्रपटाने एकूण २३८.२५ कोटी कमावले आहेत. ‘वॉर २’ आणि ‘कुली’ हे दोन मोठे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले असतानाही, ‘महावतार नरसिम्हा’ने पाचव्या आठवड्यात १८.५० कोटींहून अधिक कमाई केली.
‘महावतार नरसिम्हा’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड सिनेमा ठरला आहे. पूर्वीचा विक्रम रजनीकांत यांच्या ‘कोचडैयन’ने केला होता. ‘कोचडैयन’ या सिनेमाने फक्त ३० कोटींची कमाई केली होती. इतकंच नव्हे तर परदेशातही ‘महावतार नरसिम्हा’ने चांगली कमाई केली आहे. सध्या चित्रपटाची एकूण जागतिक कमाई ३१० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.
३१० कोटींच्या कमाईसह, ‘महावतार नरसिम्हा’ केवळ सर्वात मोठी ॲनिमेटेड हिट ठरलेली नाही, तर या सिनेमाने ‘सूर्यवंशी’ (३०० कोटी) आणि ‘द केरला स्टोरी’ (३०४ कोटी) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
‘महावतार नरसिम्हा’च्या कथानकाबद्दल सांगायचं झाल्यास, भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची कथा आणि भक्त प्रल्हादाचा संघर्ष या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. लहान मुलं आणि कौटुंबिक मनोरंजनाचा आकर्षण ठरलेला ‘महावतार नरसिम्हा’ चित्रपट इतका लोकप्रिय झाला आहे की, आता त्याच्या पुढील भागांची निर्मितीसुद्धा निश्चित झाली आहे.