Malaika Arora On Her Divorce : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी अभिनेता अरबाज खानबरोबर लग्न केले. मात्र १९ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये मलायकाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. मलायकाने तिच्या अरबाजबरोबरच्या नात्याबद्दल याआधीही अनेकदा प्रतिक्रिया दिली आहे.

अशातच नुकत्याच एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल तिचं मत व्यक्त केलं. पिंकव्हिलाशी साधलेल्या संवादात मलायका म्हणाली, “माझं लग्न आयुष्यभर टिकावं, अशी माझी मनापासून इच्छा होती. पण याचा अर्थ असा नाही की, माझा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे. याचा अर्थ असा नाही की, मी मोठी चूक केलीय आणि याचा अर्थ असाही नाही की, माझं आयुष्य वेगळ्या मार्गाने गेलं असतं तर काही बदललं असतं.”

यापुढे ती म्हणते, “जे घडायचं होतं, ते घडलं. आमच्या नात्यातल्या काही गोष्टी सुधाराव्यात आणि काहीतरी सकारात्मक व्हावं म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. पण शेवटी एक क्षण असा आला जिथे हे नातं पुढं टिकणार नाही असं जाणवलं.”

यानंतर मलायका म्हणते, “लोक अनेकदा विसरतात की, स्वतःला प्राधान्य देण्यात काहीही चुकीचं नाही. बर्‍याच जणांना वाटतं की, ‘स्वतःसाठी’ काही करणं म्हणजे स्वार्थीपणा. पण खरंतर, स्वतःचा विचार करणं गरजेचं असतं. विशेषतः जेव्हा तुम्ही पालक असता. कारण स्वतः आनंदी असाल, तरच तुम्ही तुमच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी काही चांगलं करू शकता. त्यावेळी मला वाटलं की, आता स्वतःसाठी निर्णय घ्यायला हवा. तेव्हा मी आनंदी नव्हते; म्हणूनच घटस्फोटाचा निर्णय घेतला.”

यापुढे मलायका म्हणाली, “माझ्या त्या निर्णयानंतर मला अनेकांनी ‘स्वार्थी’ म्हटलं. पण कदाचित तुमच्यासाठी तेव्हा मी स्वार्थी असेन, पण माझ्यासाठी तो निर्णय घेणं गरजेचं होतं. जेव्हा तुम्ही आतून तुटलेले असता, तेव्हा स्वतःचा विचार करणं चुकीचं नाही असं मला वाटतं.”

यानंतर मलायका म्हणाली, “आता जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा वाटतं की, त्या निर्णयामुळे मी अधिक समजूतदार, स्थिर आणि शांत झाली आहे. आज मी एका अशा टप्प्यावर आहे; जिथं मी स्वत:ला समाधानी मानते. मला वाटतं एखादं नातं टिकवायचं नसेल, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यात काही चूक नाही. त्यातून समजूतदारपणे वेगळं होणं आणि तरीही मूल, कुटुंब यांच्यासाठी आदर टिकवणं हेच खरं परिपक्व असल्याचं लक्षण आहे.”