Malaika Arora on trolling: मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, तिचे आयटम सॉंग्स मोठ्या प्रमाणात गाजले. तिला या गाण्यांमधून मोठी ओळख मिळाली.

‘छैया छैया’, ‘मुन्नी बदनाम हुई’ अशा गाण्यांमधून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या अनोख्या डान्सच्या स्टाईलसाठी आणि ऊर्जेसाठी मलायका अरोरा ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मलायकाने, जेव्हा आयटम सॉंगमध्ये काम केले जाते तेव्हा तुमच्यावर अनेक मर्यादा येतात असे वक्तव्य केले आहे.

मलायका अरोराने नुकतीच हिंदूस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मला जितकी संधी आयटम साँग करण्याची मिळाली, तितकी मला अभिनयासाठी ऑफर आली नाही. मला डान्स करणे खूप आवडते. परफॉर्मन्स करणे हे माझे आवडते काम आहे.

याच मुलाखतीत अभिनेत्री असेही म्हणाली की, जेव्हा गाण्याला आयटम नंबर असे लेबल लावले जाते, तेव्हा त्याबरोबर मर्यादा येतात. पण, आज मी पाहते की अनेक कलाकार त्याकडे एक क्रिएटिव्ह चॅलेंज म्हणून पाहतात. डान्स संकल्पना, परफॉर्मन्स, गाणे एखाद्या चित्रपटाच्या कथेत कसे बरोबर फिट बसते, यावर लक्ष केंद्रित केले जाते. अशी गाणी बनवताना त्याकडे आदराने पाहिले जाते.”

मलायका असेही म्हणाली की, फक्त अभिनय किंवा डान्सच नाही तर मला दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातदेखील काम करायला आवडेल. पडद्यामागची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल.

मलायकाने नुकताच तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला. याबद्दल तिने तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ती म्हणाली, “माझे हृदय भरून आले आहे. इतक्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. माझा ५० वा वाढदिवस इतक्या उत्तम पद्धतीने साजरा केला, त्यासाठी धन्यवाद.”

“या सगळ्यात स्वत:ला…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “काळाबरोबर पुढे गेले पाहिजे, पण या सगळ्यात स्वत:ला बदलू नये. तुम्हाला शिकत राहावे लागते, तंदुरुस्त राहावे लागते. तुम्हाला आयुष्य भरभरून जगता आले पाहिजे.”

“मला कधीच कोणत्याही एका प्रतिमेमध्ये अडकायला आवडत नाही. मला आशा आहे की वारसा हा निर्भयतेचा असतो. लोक तुम्हाला जज करतात, तुमच्या मार्गातील अडथळे बनतात; परंतु या सगळ्याला न जुमानता आयुष्यात पुढे जाता आले पाहिजे.”

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ ला घटस्फोट झाला आहे. त्यांना अरहान हा २३ वर्षांचा मुलगा आहे. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायकाला तिच्या आयुष्यात प्रेम असावे, तिचा जोडीदार असावा असे वाटते. ती अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्येदेखील होती. मात्र, यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

यावर अभिनेत्री म्हणाली, “मला माझ्या सत्यावर विश्वास ठेवायचा आहे. मला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. नकारात्मक गोष्टींना मी माझी किंमत ठरवू देत नाही. ट्रोल करणारे ट्रोलिंग करत राहतील, मी नकारात्मकतेमध्ये अडकून राहायचे नाही असे ठरवले आहे. माझे कुटुंब, माझा मित्र परिवार आणि माझ्या मनाची शांतता खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते.”