‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरीने मुंबईत आल्यावर तिला आलेले काही धक्कादायक अनुभव सांगितले होते. नर्गिस भारतात आल्यावर सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होती. पण नंतर तिने मुंबईत स्वतःचं घर घेतलं. मात्र या घरात ती फक्त तीन दिवस राहू शकली होती. त्याचं कारण म्हणजे त्या घरात घडणाऱ्या विचित्र गोष्टी.
नर्गिसने त्या घरात राहत असताना तिला पडलेली स्वप्ने सांगितली. इतकंच नाही तरते घर सोडताना तिला आलेला विचित्र अनुभवही तिने शेअर केला होता. त्या घरात असताना जे घडलं ते समजण्यापलिकडचं होतं, असं नर्गिस म्हणाली होती.
नर्गिस फाखरीला पडलेली वाईट स्वप्ने
नर्गिस जेव्हा मुंबईत नवीन होती, तेव्हाचा एक किस्सा तिने सांगितला होता. “मी मुंबईत स्वतःच घर घेतलं तेव्हा मी खूप खुश होते कारण ते घर मी स्वतःच्या मेहनतीने घेतलं होतं. ते माझं घर हिल रोडवर स्मशानभूमीच्या जवळ होतं. त्या घरात मी फक्त तीन दिवस राहू शकले होते. कारण तिथे मला खूप विचित्र स्वप्नं पडायची आणि अचानक रात्री-अपरात्री जाग यायची. ती स्वप्ने खूप भीतीदायक होती. एक भुतासारखा सहा फूट उंच पांढरे कपडे घातलेला माणूस मला स्मशानभूमीत घेऊन गेला. त्याने स्मशानात हाताने जमीन खणली, मग मृतदेह बाहेर काढून त्यावरील मांस खाऊ लागला. तो मलाही मांस खायला सांगायचा. मला सलग तीन दिवस हे स्वप्न पडलं,” असं नर्गिस म्हणाली होती.
“मला रोज रात्री अशी भीतीदायक स्वप्ने पडायची आणि रोज रात्री ३ वाजता मी झोपेतून जागी व्हायची. मला रोज स्वप्नात विचित्र माणूस दिसायचा. त्याची उंची ६ फूट ५ इंच असेल,” असं नर्गिसने म्हटलं होतं. यानंतर नर्गिसने ते घर सोडलं.
नर्गिसने तिच्या टीमला दिल्ली शिफ्ट व्हायला सांगितलं. कारण नंतर कपाटाजवळ तिला ६ मृत पक्षी आढळले होते. लोक सामान पॅक करायला आले तेव्हा तिला हे पक्षी दिसले आणि इतक्या विचित्र गोष्टी पाहून नर्गिस गोंधळली. हे सगळं का घडतंय, समजत नव्हतं असं तिने म्हटलं होतं.
नर्गिस फाखरीचा जन्म अमेरिकेत झाला. तिचे वडील पाकिस्तानी व आई अमेरिकन होती. ती ६ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. नर्गिस सिनेमात करिअर करायला भारतात आली. इम्तियाज अलीचा ‘रॉकस्टार’ हा तिचा पहिला चित्रपट होता. यात रणबीर कपूरची मुख्य भूमिका होती. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि नर्गिसला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ‘मद्रास कॅफे’, ‘अजहर’ सह इतर अनेक चित्रपट केले.