नसीरुद्दीन शाह हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. आता ते अभिनेत्री रत्ना पाठकबरोबर आनंदाने संसार करत आहेत, पण रत्ना नसीरुद्दीन यांची पहिली पत्नी नाही. नसीरुद्दीन यांचे आधी लग्न झाले होते आणि त्या लग्नामुळे त्यांना खूप पैसा गमवावा लागला होता.

बॉलीवूड शादीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, जेव्हा नसीरुद्दीन शाह त्यांची पहिली पत्नी परवीन मुराद यांना भेटले तेव्हा ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिकत होते. नसीरुद्दीन शाह फक्त १९ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी ३४ वर्षीय परवीनशी लग्न केलं होतं. परवीन घटस्फोटित होती आणि तिला मुलं देखील होती, असं म्हटलं जातं. नसीरुद्दीन शाह व परवीनचं लग्न झालं आणि नंतर वर्षभराने ते एका मुलीचे वडील झाले.

नसीरुद्दीन शाह व परवीन यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ आनंदी राहिले नाही. लवकरच दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या. खरं तर दोघांची कुटुंबे त्यांच्या लग्नाच्या निर्णयावर खूश नव्हती. नसीरुद्दीन यांच्या कुटुंबाने परवीन घटस्फोटित आणि त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठी असल्याने आक्षेप घेतला होता. तर परवीनच्या कुटुंबालाही हे नातं मान्य नव्हतं. लग्नानंतर लवकरच दोघेही वेगळे झाले आणि नसीरुद्दीन शाह यांना परवीनला १२ वर्षांसाठी पोटगी द्यावी लागली.

घटस्फोटानंतर परवीनच्या कुटुंबाच्या मागणीनुसार, नसीरुद्दीन शाह यांना परवीन मुरादला पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यावी लागली होती. पोटगीची रक्कम पूर्ण देण्यासाठी नसीरुद्दीन शाह यांना एका दशकाहून अधिक काळ लागला. त्या काळात त्यांना ‘मासूम’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट साइन करून मिळालेल्या पैशांमधून त्यांनी परवीनला उर्वरित रक्कम दिली होती.

परवीनबरोबरचं नातं मोडल्यानंतर नसीरुद्दीन शाह १९७५ मध्ये रत्ना पाठकला भेटले. त्यावेळी दोघेही थिएटर करत होते. लवकरच त्यांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि ते एकमेकांना डेट करू लागले. नसीरुद्दीन शाह यांचे लग्न कायदेशीररित्या संपले नव्हते, त्यामुळे ते लग्न न करता रत्ना पाठकबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. सुमारे ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी १९८२ मध्ये लग्न केले.