अमृता सुभाषने आजवर अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. नुकताच तिचा ‘जारण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अमृताने मराठीसह हिंदीतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. यावेळी तिने तिच्या तेथील एका नाटकाबद्दल सांगितलं आहे. तिच्या या नाटकाला अभिनेते नसीरुद्दीन शाह उपस्थित असल्याचं म्हटलं आहे.
‘लल्लनटॉप’शी संवाद साधताना अमृता म्हणाली, “मी ‘त्रीष्ना’ नावाचं एक नाटक करत होते. त्यामध्ये एक सीन होता, जिथे मला रडायचं असतं आणि लोक त्या सीनचं कौतुक करायचे. त्यामुळे मला असं वाटलं की, मी खूप छान काम करत आहे. मला माझा खूप अभिमान वाटत होता, अहंकार निर्माण झाला होता. तेव्हा नसीरुद्दीन सर आले. त्यांनी माझे दोन प्रयोग पाहिले आणि त्यांनी पाहिलं की लोक माझं कौतुक करत आहेत, त्यामुळे मला असंच वाटत होतं की इतरांप्रमाणे तेसुद्धा माझं कौतुकच करणार आहेत. प्रयोग संपल्यानंतर आम्ही एका चहाच्या टपरीजवळ उभे होतो. तिथे नसीरुद्दीन सर होते, ते माझ्याकडे येत आहेत हे मला माहीत होतं; पण मी माहीत नसल्यासारखं केलं.”
“नसीरुद्दीन सर माझ्याकडे आले आणि म्हणाले, अमृता मला काळजी वाटतेय. त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मला वाटलेलं लोकांनी एवढं कौतुक केलं आहे, पण मग यांना काळजी का वाटतेय.” अमृता पुढे म्हणाली, ते मला म्हणाले, “बेटा मी तुझे दोन्ही प्रयोग पाहिले आहेत आणि तू टाळ्या मिळवण्यासाठी तेच तेच करत होतीस; त्यापेक्षा मला तुला दुसरं काही तरी करताना बघायला आवडेल, त्यात तुला यश नाही आलं तरी चालेल, पण तेच तेच करण्यापेक्षा काहीतरी नवीन करणं चांगलं असेल. त्यानंतर मी त्यांची माफी मागितली आणि मला कळलं की माझं नेमकं काय चुकलेलं.”
अमृता व नसीरुद्दीन यांनी नंदिता दासच्या ‘फिराक’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नसीरुद्दीन शाह हे रंगभूमीवरचे नावाजलेले कलाकार आहेत. आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मराठीत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेतच, पण ती ‘लस्ट स्टोरीज’च्या दुसऱ्या भागात झळकली होती. यासह तिने ‘गली बॉय’, ‘सेक्रेड गेम्स’ यांसारख्या हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करत हिंदीतल्या प्रेक्षकांचंही लक्ष वेधलं आहे.