‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणारे अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्यानं प्रेक्षकांची निराशा झाली. आणि तेव्हापासून सोशल मीडियावर या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या. ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांमध्ये परेश रावल यांनी बाबू भैयाची भूमिका साकारली होती. त्या काळी चित्रपटाला आणि परेश यांनी साकारलेल्या बाबू भैयाच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
चित्रपटांतील राजू, बाबू भैया व श्याम या पात्रांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. विशेषकरून त्यातील बाबू भैया या पात्राला तर लोकांनी डोक्यावर उचलून धरलं. बाबूराव गणपतराव आपटे असे या पात्राचे पूर्ण नाव. नाव सांगण्याच्या स्टाईलपासून ते चेहऱ्यावरील हावभाव या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. चित्रपटात ही भूमिका परेश रावल यांनी चोखंदळपणे साकारली होती. त्यामुळेच आता त्यांनी ही भूमिका साकारण्यास नकार दिल्यानंतर प्रेक्षक निराश झाले आहेत.
बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका अशा काही भूमिकांपैकी एक आहे, ज्यांची तुलना दुसऱ्या कुठल्याच भूमिकेशी होऊ शकत नाही. या भूमिकेचं एक वेगळेपण आहे आणि त्यामुळे या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण, बाबूराव आपटे या भूमिकेमागचा किस्सा तुम्हाला माहीत आहे का?. ‘लोकमत फिल्मी’ने याचा एक किस्सा शेअर केला आहे. ‘हेरा फेरी’ चित्रपटातील बाबूराव आपटे ही भूमिका गुजराती थिएटरमधील प्रसिद्ध संगीतकार रजत ढोलकिया यांच्यावरून प्रेरित होऊन रेखाटली गेली होती. अभिनेता स्नेहल डाबीने याबाबत खुलासा केला होता. पांढरी बनियान, जाड भिंगांचा चष्मा, बोलण्याची स्टाईल असाच रजत ढोलकिया यांचा हुबेहूब अंदाज आहे.
‘हेरा फेरी’मध्ये आपल्यावरून हे बाबूराव पात्र उभे करण्यात आलं आहे. हे कळल्यानंतर ते सुद्धा खूप हसले होते. रजत ढोलकिया यांनी ‘धारावी’, ‘होली’, ‘मिर्च मसाला’, ‘१९४२ अ लव्ह स्टेरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये संगीत दिग्दर्शन केलं आहे. रजत ढोलकिया यांच्यावरून प्रेरित झालेल्या बाबूराव गणपतराव आपटे या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.