Pratik Gandhi Reaction On Phule Movie Failure : थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधीने महात्मा ज्योतिबा फुलेंची आणि अभिनेत्री पत्रलेखाने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली होती.
‘फुले’चा ट्रेलर प्रदर्शित होताच हा सिनेमा अनेक कारणांनी चर्चेत आला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले होते. मांग, महार, पेशवाई हे शब्द या चित्रपटातून हटवण्यास सांगितले. तसंच ब्राह्मण समाजातील काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर २५ एप्रिलला अखेर सिनेमा प्रदर्शित झाला. पण या सिनेमाला म्हणवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
‘फुले’ सिनेमाच्या या अपयशाबद्दल मुख्य अभिनेता प्रतीक गांधी पहिल्यांदाच त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमर उजालाशी साधलेल्या संवादात प्रतीकने ‘फुले’ सिनेमाच्या अपयशाबद्दल दु:ख व्यक्त केलं. याबद्दल प्रतीक म्हणतो, “हो… एखादा सिनेमा चालला नाही; तर थोडं वाईट वाटतं. विशेषतः ‘फुले’सारख्या चित्रपटासाठी माझ्या मनात खूप अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं की, तो सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. पण तसं घडलं नाही, याची खंत आहे.”
यापुढे प्रतीक म्हणाला, “जेव्हा मी एखाद्या सिनेमाची संहीता (स्क्रिप्ट) वाचतो, तेव्हा ठरवतो की, ती भूमिका माझ्यासाठी योग्य आहे का? एकदा ती स्वीकारली की, मी माझं १००% देतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेपेक्षा मला माझ्या स्वतःच्या कामातून खरं समाधान मिळतं.” यापुढे अभिनेत्याला चांगल्या सिनेमांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देत प्रतीक म्हणतो, “हो, नक्कीच… इंडस्ट्रीत सिनेमा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची एक व्यवस्था असायला हवी. तंत्रज्ञान आहेच, फक्त ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा योग्य मार्ग शोधायला हवा. इंडस्ट्री हळूहळू त्या दिशेने जात आहेक, पण त्यावर अजून काम करावं लागेल.”
दरम्यान, प्रतीकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्कॅम १९९२’ या वेबसीरिजमुळे तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. ‘स्कॅम १९९२’ या सीरिजबरोबरच त्याने ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘दो और दो प्यार’ अशा काही सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच तो ‘सारे जहाँ से अच्छा’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात तो एक हेर (गुप्त एजंट)च्या भूमिकेत दिसणार आहे.