गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रियांका चोप्राच्या नावे एक पोस्ट व्हायरल होत आहे. प्रियांकाने मुलांनी मुली निवडताना ती व्हर्जिन आहे की नाही ते बघू नये, असं त्यात लिहिलं होतं. आता प्रियांकाने इन्स्टाग्रामवर या पोस्टबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांकाची व्हायरल पोस्ट नेमकी काय? आणि तिने त्यासंदर्भात काय स्पष्टीकरण दिलंय, ते जाणून घेऊयात.
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आपल्या चित्रपटांबरोबरच ग्लॅमरसाठी ओळखली जाणारी प्रियांका तिला आवडणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियांका खूप स्पष्टवक्ती आहे. ती तिची मतं ठामपणे मांडत असते. बऱ्याचदा मुलाखतींमधील तिचे रील्स व्हिडीओ व्हायरल होत असतात.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली. ज्यात “व्हर्जिन बायको शोधू नका, अशी मुलगी शोधा जिचं आचरण चांगलं असेल. कारण व्हर्जिनिटी तर एका रात्रीत संपते, पण माणसाचं आचरण कायम राहतं” असं प्रियांका चोप्रा म्हणाल्याचा उल्लेख होता. आता प्रियांकाने अशीच एक व्हायरल पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने असं काहीच म्हटलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण
“ही मी नाही. आवाजही माझा नाही आणि हे विधान मी केलेलंही नाही. फक्त ते ऑनलाइन आहे म्हणून ते खरं आहे असं नाही. व्हायरल होण्यासाठी फेक कंटेंट क्रिएट करणं आता खूप सोपं झालं आहे. पण माझ्या नावे केल्या जाणाऱ्या या दाव्याबरोबर कोणत्याच लिंक्स किंवा ‘सोर्स’ (माहितीचा स्त्रोत) दिलेला नाही. इतरही अनेक ठिकाणी या पोस्ट्स आहेत, पण त्या खऱ्या नाही. थोडा वेळ घ्या, अशा प्रकारची माहिती एकदा पडताळून पाहा. तुम्ही स्क्रोल करता त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ऑनलाइन सुरक्षित राहा,” असं प्रियांकाने तिच्या नावे पसरवली जाणारी पोस्ट शेअर करून लिहिलं.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून प्रियांका चोप्राच्या नावे ही व्हर्जिनिटीसंदर्भातील पोस्ट व्हायरल होत होती. या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. पण प्रियांकाने हे विधान नेमकं कुठे केलंय, याबद्दल कोणतीच माहिती व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आली नव्हती. अखेर हे सगळं खोटं असून आपण असं कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. हा आवाज किंवा या ओळी आपल्या नसल्याचं प्रियांकाने पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.