RajaMouli Praises Genelia Deshmukh : जिनिलीया देशमुख बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच ती आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मधून झळकली. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या आगामी दाक्षिणात्य चित्रपटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी तिचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
जिनिलीया ‘ज्युनिअर’ या दाक्षिणात्य चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जिनिलीयासह दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला, अभिनेते राव रमेश, आर. रवीचंद्रन हे कलाकार झळकणार आहेत. राधाकृष्ण रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जिनिलीया या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे.
‘ज्युनिअर’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमाला दिग्दर्शक, निर्माते राजामौलींनीही हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी जिनिलीयाच्या तेलुगू इंडस्ट्रीतील पुनरागमनाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘पिंकव्हिला साऊथ’च्या वृत्तानुसार, राजामौली जिनिलीयाला म्हणाले, “किती वर्षे झाले पण तू अजूनही तशीच दिसत आहेस. मी सिनेमॅटोग्राफर सेंथिलला विचारलं होतं की, आपल्याला नवीन जिनिलिया दिसेल का तर तोसुद्धा म्हणाला हो नक्कीच. त्यामुळे मी आतुरतेने तुझी वाट बघत आहे”.
जिनिलीया यावर म्हणाली, “तुम्ही खूप चांगले आहात सर माझ्यासाठी तुमचे हे शब्द फार महत्त्वाचे आहेत”. जिनिलीया शेवटचं ‘ना इश्तम’ या तेलुगू चित्रपटातून झळकली होती. त्यानंतर आता ती ‘ज्युनिअर’ चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. जिनिलीयाने आजवर ‘बॉईज’, ‘सचिन’, ‘हॅपी’, ‘बोम्मारिल्लू’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘उरुमी’ यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केलं आहे.
जिनिलीया देशमुखने दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांसह काम केलं आहे. फक्त दाक्षिणात्य चित्रपटच नव्हते तर तिने हिंदी चित्रपटांतही काम करत तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. लग्नानंतर अभिनेत्री तिच्या नवऱ्यासह मराठी चित्रपटांतही काम करताना पाहायला मिळाली. त्यामुळे अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
जिनिलीया देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी (१८ जुलै) ला तिचा ‘ज्युनिअर’ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ती आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ मधून झळकली होती. यामध्ये जिनिलीयाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यानंतर अभिनेत्री ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून झळकणार आहे.