Rajesh Khanna Had To Sit On His Own Luggage On Airport: दिवंगत बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. राजेश खन्ना यांनी जितके यश पाहिले, तितकेच अपयशदेखील त्यांनी पाहिले. त्यांच्या कारकिर्दीमधील अनेक किस्से आजही सांगितले जातात.
जेव्हा राजेश खन्ना यांचा उतरता काळ सुरू झाला, तेव्हा त्यांनी मद्य प्राशन करण्यास सुरुवात केली होती. ते एकटेपणाचे आयुष्य जगले. त्यांची असुरक्षितता वाढू लागली. राजेश खन्ना यांचे जवळचे मित्र व पत्रकार अली पीटर जॉन यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दल एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी राजेश खन्ना यांचा पडता काळ कसा होता, याबद्दल लिहिले.
राजेश खन्ना यांची पडत्या काळात झालेली ‘अशी’ अवस्था
अली पीटर जॉन यांनी एका राजेश खन्ना यांच्याविषयीच्या लेखात लिहिले होते की, राजेश खन्ना संपूर्ण दिवस एकटेच असत. अशा वेळी ते त्यांच्या यशाच्या काळातील आठवणींना उजाळा देत, वर्तमानकाळाबद्दल दु:ख करीत असत आणि भविष्यकाळातील अस्थिरतेबद्दल त्यांना भीती वाटत असे. पुढे अली पीटर जॉन यांनी एका कोलकातामधील एका कार्यक्रमाला राजेश खन्ना यांच्याबरोबर उपस्थित राहिल्याची आठवण सांगितली. राजेश खन्ना त्यावेळी अली पीटर जॉन यांना म्हणाले होते की, मी खूप दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेलो नाही. कारण- प्रेक्षक येतील की नाही, ही मला भीती वाटते. त्यावर अस्वस्थता दूर करण्यासाठी अली पीटर जॉन यांनी त्यांना दोन पेग पिण्याचा सल्ला दिला.
अली पीटर यांचा सल्ला ऐकून राजेश खन्ना त्यांना म्हणाले होते की, कोणत्याही कार्यक्रमात दारू पिऊन जाणे योग्य वाटत नाही. महिलांच्या कार्यक्रमात तर नाहीच. कार्यक्रमात त्यांचे कौतुक झाले. तेव्हा राजेश खन्ना अली पीटर यांना म्हणाले की, मी अजूनही सुपरस्टार आहे, असे वाटत नाही का? पण, राजेश खन्ना यांचा भ्रम लवकरच दूर झाला.
अली पीटर यांनी लिहिले, “कार्यक्रम संपला. आम्ही परत निघालो. विमानतळावर आलो तेव्हा राजेश खन्ना यांना कोणीही ओळख दाखविली नाही. तसेच त्यांना बसण्यासाठीदेखील कोणी जागा दिली नाही. त्यांना जागा देण्यासाठी कोणीही इच्छुक नव्हते. शेवटी राजेश खन्ना यांना त्यांच्या स्वत:च्या बॅगेवर बसावे लागले. एका सुपरस्टारवर अशी वेळ येईल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. एकेकाळी सर्व प्रकारच्या सिंहासनांवर बसलेला तो माणूस आता त्याला कोणीतरी जागा द्यावी, याची वाट पाहत होता. पण, कोणीही त्यांना जागा दिली नाही.
२०१२ मध्ये राजेश खन्ना यांचे कर्करोगाने निधन झाले .राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘राज’, ‘खामोशी’, ‘बंधन’, ‘दुश्मन’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘दाग’, ‘प्रेम नगर’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा होताना दिसते.