Rajinikanth Coolie Movie Cast Fee : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी खलनायकाच्या भूमिकांमधून केली, परंतु मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे आणि ते स्थान आजही कायम आहे. रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
अशातच आता त्यांचा ‘कुली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रजनीकांत यांचा ‘कुली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं आगाऊ बुकिंग शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सुरु झालंय आणि अवघ्या ३० मिनिटांत १०,००० तिकिटे विकली गेली आहेत.
आता या चित्रपटातील कलाकारांना मिळालेल्या मानधनाची माहिती समोर आली आहे. Deccan Herald नुसार, ‘कुली’ चित्रपटासाठी रजनीकांत यांनी तब्बल २०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचं वृत्त आहे. सुरुवातीला त्यांना १५० कोटी रुपये दिले जाणार होते, पण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रचंड वाढ झाल्यानंतर हे मानधन वाढवण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे.
‘कुली’ चित्रपटात बॉलीवूडचं मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचीसुद्धा एक छोटीशी भूमिका आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने २० कोटींचं मानधन घेतलं होतं अशी माहिती होती. मात्र, त्याच्या जवळच्या सूत्रांनी आता स्पष्ट केलं आहे की, आमिर खानने या भूमिकेसाठी एकही रुपया घेतलेला नाही. त्याने हा चित्रपट रजनीकांत यांच्यावरील प्रेम आणि आदरापोटी स्वीकारला.
‘कुली’ चित्रपटात सायमनची भूमिका साकारणाऱ्या नागार्जुन अक्किनेनी यांना त्यांच्या अभिनयासाठी १० कोटी रुपये मानधन मिळालं आहे, तर अभिनेत्री श्रुती हसनला ४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर ‘बाहुबली’मध्ये कटप्पाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते सत्यराज यांना ५ कोटी रुपये मानधन मिळालं आहे.
या चित्रपटानंतर रजनीकांत ‘जेलर २’ मध्ये झळकणार असून, हा चित्रपट नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही रजनीकांत यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि ते आजही ‘मास हिरो’ म्हणून ओळखले जातात.