Shah Rukh Khan Dunki Movie Review: राजकुमार हिरानी हे नाव घेतलं की प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात कारण त्यांचे चित्रपट हे फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाहीत, तर त्यांच्या चित्रपटांचे विषय, मांडणी आणि सादरीकरण हे प्रेक्षकांच्या काळजाला हात घालते. जिथे बॉक्स ऑफिसवर गेले काही महीने केवळ आणि केवळ व्यावसायिक मसाला चित्रपट धुडगूस घालत आहेत अशा वातावरणात वर्षाच्या शेवटी राजकुमार हिरानी शाहरुख खानला घेऊन ‘डंकी’सारखा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत जो पाहताना एक चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळतंच पण तरीही खास ‘राजकुमार हिरानी टच’ या चित्रपटात हरवला आहे असं चित्रपटगृहातून बाहेर पडताना वाटत राहतं.

मुळात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘डाँकी फ्लाइट’ या विषयाला हात घालून अर्धी लढाई तिथेच जिंकली असली तरी उर्वरित लढाईमध्ये स्वतः या चित्रपटाचे लेखक राजकुमार हिरानी, अभिजात जोशी व कनिका धिल्लन हे कमी पडले आहेत. पंजाबमधील तरुणांमध्ये बाहेरील देशांत आणि खासकरून लंडनमध्ये स्थायिक व्हायचं वेड, त्यामागची त्यांची पार्श्वभूमी, गरज हि गोष्ट अत्यंत बारकाईने चित्रपटात मांडली आहे. तसंच एकूणच तिथल्या तरुणांची शिक्षणाबाबतीतली अनास्था, इंग्रजीबद्दलचं अज्ञान पण बाहेरील देशात जाऊन पडेल ते काम करून चांगलं जीवन जगायची जिद्द अन् या जिद्दीतूनच त्यांचं ‘डाँकी फ्लाईट’सारख्या अवैध मार्गांचा वापर करणं हे या कथेत अगदी उत्तमरित्या पेरलं आहे. परंतु ज्याप्रमाणे राजकुमार हिरानी यांचे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, किंवा ‘ ३ इडियट्स’ संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आजही भावुक करतात तसं लिखाण हिरानी यांच्या ‘पीके’पासूनच्या चित्रपटातून हरवलंच आहे अन् ‘डंकी’मध्येदेखील त्या दर्जेदार लिखाणाची कमतरता भासते.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Vijay Kondke movie Lek Asavi Tar Ashi trailer released
‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर
Juna Furniture trailer
Video: स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बाबाची गोष्ट, ‘जुनं फर्निचर’चा विचार करायला भाग पाडणारा ट्रेलर प्रदर्शित

संवादात फिका पडला असला तरी कथा आणि पटकथेच्या बाबतीत ‘डंकी’ तुम्हाला निराश करत नाही. खासकरून चित्रपटाचा उत्तरार्ध हा तुम्हाला हादरवणारा आहे. जी लोक या अवैध मार्गांचा अवलंब करतात त्यांचं उदात्तीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून केलं जाईल अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात होती. पण चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र या ‘डाँकी फ्लाईट’च्या मार्गाने आलेल्या लोकांचं परदेशातील दाहक वास्तव आणि त्याचा त्यांच्या पुढील आयुष्यावर होणारा परिणाम हे सगळं चित्रपटात उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे आणि त्यासाठी राजकुमार हिरानी यांना पैकीच्या पैकी मार्क द्यायलाच हवेत. फक्त लिखाणात मात्र या चित्रपटाने चांगलाच मार खाल्ला आहे. अवैध घुसखोरी करणाऱ्या लोकांची गरज समजावून देण्यासाठी शाहरुख खानचं एक बाळबोध भाषण, त्या घुसखोरी करणाऱ्या लोकांची दहशतवाद्यांशी केली गेलेली तुलना आणि ही जमीन परमेश्वराची आहे अन् केवळ माणसाने सीमारेषा आखल्याने त्यावर आपली मालकी सिद्ध होत नाही या आशयाचे संवाद कथेचं गांभीर्य घालवतात अन् अशा दिग्गज लेखकांकडून असे सुमार दर्जाचे संवाद अजिबात अपेक्षित नाही.

आणखी वाचा : Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट

बाकी चित्रपट कथा आणि वेगवेगळ्या पात्रांच्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून तुम्हाला हसवतो आणि भावुकही करतो. काही ठिकाणी हा चित्रपट विखुरलेले तुकडे एकत्र जोडून तयार केल्यासारखाही वाटतो ते केवळ अन् केवळ त्याच्या लिखाणामुळे. शिवाय मानवी भावनांना हात घालण्यातही हा चित्रपट यशस्वी होतो पण ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ किंवा ‘३ इडियट्स’सारखा याचा प्रेक्षकांवर प्रभाव कितपत राहील ही शंका आहेच. इतकंच नव्हे तर हा मार्ग अवलंबलेल्या लोकांना नेमक्या कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची झलकही काही खऱ्या फोटोग्राफ्सच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, पार्श्वसंगीतदेखील साजेसं आणि कथानक पुढे नेणारंच आहे. प्रीतम यांचं संगीत उठावदार नसलं तरी श्रवणीय आहे, खासकरून क्लायमॅक्सला येणारं सोनू निगमचं ‘निकले थे कभी हम घर से’ हे गाणं आणि त्याचं चित्रीकरण यामध्ये मात्र तुम्हाला ‘राजकुमार हिरानी टच’ हमखास जाणवतो.

विकी कौशलचं पात्र आणि त्याची गोष्ट तुमच्या डोळ्यात हमखास पाणी आणते पण चित्रपटात कुठेतरी त्याचं पात्र हे मिसफिट वाटतं, पण विकीने मात्र ते अत्यंत सच्चेपणाने निभावलं आहे. बल्लीच्या भूमिकेत अनिल ग्रोव्हर, मन्नूच्या भूमिकेत तापसी पन्नू, बुग्गूच्या भूमिकेत विक्रम कोचर यांची कामं चोख झाली आहेत. बोमन इराणी यांनी साकारलेला इंग्रजीचा प्रोफेसर गुलाटी भाव खाऊन जातो. याबरोबरच इतरही सहकलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. ‘जवान’ आणि ‘पठाण’सारखे मसालापट दिल्यानंतर ‘डंकी’मध्ये हरदयाल सिंग धिल्लन हे पात्र साकारणाऱ्या शाहरुख खानने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘स्वदेस’नंतर शाहरुख खानचा बहुतेक हा पहिला चित्रपट आहे ज्यात तो शाहरुख खान वाटत नाहीये अन् राजकुमार हिरानी यांनी ती गोष्ट जाणीवपूर्वक बाजूला ठेवली आहे. यातही शाहरुखचा रोमान्स, मेलोड्रामा आहे पण शाहरुखने त्याची टिपिकल इमेज बाजूला ठेवत ‘हार्डी’ला आपलंसं केलं आहे जे बऱ्याच प्रेक्षकांसाठी एक खूप मोठं सरप्राइज पॅकेज ठरू शकतं. खूप दिवसांनी स्टारडम बाजूला ठेवून शाहरुख एक अभिनेत्याच्या रूपात तुमच्यासमोर येतो ही फार मोठी गोष्ट आहे. फक्त यामध्ये शाहरुखचे पात्र सैन्यातील अधिकारी दाखवण्याचा अनाठायी प्रकार जर टाळला असता तर बऱ्याच गोष्टी आणखी सोप्या झाल्या असत्या हे मात्र नक्की.

सध्या ‘सालार’, ‘जवान’, ‘टायगर’ ‘अ‍ॅनिमल’सारख्या अॅक्शनने भरपुर अशा चित्रपटांच्या गर्दीत ‘डंकी’सारखा विषय अतिशय आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडणाऱ्या राजकुमार हिरानी यांचं कौतुक करायलाच हवं. ‘डंकी’ हा त्यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे उत्कृष्ट आणि सदाबहार या पठडीतला जरी नसला तरी प्रेक्षकांची नस अचूक ओळखून त्यांचं मनोरंजन आणि काही उपदेशपर डोस पाजणारा नक्कीच आहे. लिखाणात कमी पडला असला तरी कथा, विषय, मांडणी आणि अभिनय यांच्या जोरावर ‘डंकी’ प्रेक्षकांना त्यांनी बाजूला काढलेलं डोकं पुन्हा जागेवर ठेवून विचार करायला लावेल अन् एक चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान देईल हे मात्र नक्की.