बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली. २००० मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रटातून त्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटातील अभिनय आणि त्याच्या डान्स स्टेप्सने साऱ्यांनाच भुरळ घातली. हृतिकने ‘कहो ना प्यार है’मधून मिळालेल्या यशानंतर लगेचच सुझान खानबरोबर लग्न केलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. आता ऋतिक रोशनच्या घटस्फोटावर वडील राकेश रोशन यांनी मोकळेपणाने त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

राकेश रोशन यांनी नुकतेच एका मुलाखतीत यावर उघडपणे भाष्य केलं. हृतिक रोशनबरोबर घटस्फोट झालेला असूनही सुझान खानचे रोशन कुटुंबाशी काय नातं आहे? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, “त्या दोघांचं नातं तुटलेलं असलं तरी सुझान खान आजही आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे.”

राकेश रोशन यांनी ‘युवा’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते म्हणाले, “जे काही झालं ते एका जोडप्यामध्ये झालं. ते दोघच एकमेकांच्या प्रेमात पडले, त्या दोघांनीच एकमेकांबद्दल मनात गैरसमज केले आणि वेगळे झाले. आमच्यासाठी सुझान या घरात आली तेव्हापासून आतापर्यंत ती या घरातील एक सदस्य आहे.”

राकेश रोशन यांना पुढे “हृतिक या विषयावर तुमच्याशी कधी बोलला आहे का? तुमच्या दोघांमधील नातं कसं आहे?”, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राकेश रोशन म्हणाले, “आम्ही दोघेही एकमेकांचे मित्र आहोत. मी अतिशय शिस्तबद्ध व्यक्ती आहे, त्यामुळे लहान असताना हृतिक आणि माझी मुलगी मला घाबरायचे. असं नाही की मी पटकन कुणाला ओरडतो. मात्र, मला शिस्तबद्ध राहणं आवडतं.”

“माझं लग्न फार कमी वयात झालं होतं. अगदी वयाच्या २० ते २३ वर्षांत मला मुलं झाली होती, त्यामुळे आता आम्ही सगळे मित्रांसारखे राहतो. आम्ही मित्रांप्रमाणे एकमेकांशी वागतो”, असं राकेश रोशन यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिक रोशन आणि सुझान खान या दोघांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला यावर दोघांनी अद्यापही भाष्य केलेलं नाही. इतकेच नाही तर हे दोघे आजही एकमेकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधतात. हृतिक सध्या सबा आझादला डेट करत आहे, तर सुझान खान अर्सलान गोनीला डेट करत आहे. हे चौघेही कायम एकत्र पार्टीला जातात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.