अभिनेत्री व मॉडेल राखी सावंत वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने पती आदिल खानविरोधात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर २० फेब्रुवारीला पुन्हा आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आदिल खानवर म्हैसूरमध्येही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराणी महिलेने तक्रार केल्यानंतर आदिलची म्हैसूर पोलिसांकडूनही चौकशी करण्यात येणार आहे. आदिल खान प्रकरणावरील राखीचा नवा व्हिडीओ आता समोर आला आहे. “अंधेरी कोर्टातून न्याय मिळाला नाही तर उच्च व सत्र न्यायालयात जाऊ”, असं राखी म्हणाली आहे. याशिवाय राखीने म्हैसूर प्रकरणाबाबतही भाष्य केलं.
हेही वाचा>> Video: पत्नी व मोलकरणीने केलेल्या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडलं मौन, म्हणाला “माझ्या मुलांचं…”
“आदिलवर आरोप केलेल्या इराणी महिलेने मला ऑडिओ पाठवले आहेत. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. आय लव्ह यू असं म्हणून आदिलने त्या इराणी महिलेलाही लग्नाचं वचन दिलं होतं. लग्नानंतर आदिलच्या चुका मी दहा वेळा माफ केल्या आहेत. पण त्याने लग्नाआधीच मला मारण्याचा प्लॅन केला होता”, असा खुलासा राखीने केला आहे. “आदिल मी तुला कोणत्या उद्देशाने माफ करु? तुरुंगात राहिल्यामुळे आदिलच्या वागणुकीत बदल येईल, तो सुधारेल, अशी मला अपेक्षा आहे”, असंही राखीने म्हटलं आहे.
राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फसवणूक व मारहाण केल्याबरोबरच मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप राखीने केला आहे. याबरोबरच पैसे व दागिने घेतल्याचा आणि अश्लील व्हिडीओ बनवल्याचंही राखी म्हणाली होती. तुरुंगात भेटायला गेलेल्या पतीने राखीला धमकी दिली असल्याचंही तिने सांगितलं होतं.