Ranjhana Movie : रांझणा हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी आणि तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात सोनम कपूर आणि धनुष हे दोघंही प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचा शेवट AI च्या मदतीने एडिट करण्यात आला आहे आणि चित्रपट १ ऑगस्टला नव्या शेवटासह प्रदर्शित होतो आहे. मात्र एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन सिनेमाचा शेवट बदलण्यात आल्याने इरॉस फिल्म्स विरुद्ध दिग्दर्शक आनंद एल रॉय चांगलेच नाराज झाले आहेत.
चित्रपटाचं कथानक काय?
बनारसमध्ये राहणारा कुंदन आणि मुस्लिम मुलगी झोया यांची ही प्रेमकहाणी चित्रपटात दाखवली गेली आहे. शिवाय या चित्रपटाला ए. आर. रहमानचं संगीत आहे. लहानपणापासून झोया कुंदनला आवडत असते. शाळेत जाऊ लागल्यानंतर झोयालाही कुंदन आवडू लागतो. पण हे त्यांच्या घरी कळतं तेव्हा झोयाला अलिगढ विद्यापीठात धाडलं जातं. दोघांचे मार्ग बदलतात. महाविद्यालयात शिकत असताना झोयाच्या आयुष्यात अक्रम येतो. पण एक प्रसंग असा घडतो की कुंदनमुळे अक्रमचा मृत्यू होतो. त्यानंतर झोया कुंदनचा तिरस्कार करु लागते. या सगळ्यात पुढे अशी वळणं येतात की झोया कुंदनच्या मृत्यूला जबाबदार ठरते. कुंदन मृत्यूनंतर चित्रपटाचा शेवट होतो. अशी या चित्रपटाची थोडक्यात कथा आहे. मात्र आता नव्या चित्रपटात शेवट बदलला गेला आहे. ज्याबाबत दिग्दर्शक आनंद एल रॉय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर इरॉसनेही त्यांची बाजू मांडली आहे.
दिग्दर्शक आनंद एल रॉय काय म्हणाले?
इरॉस कंपनीकडे रांझणाचे कॉपी राईट्स आहेत. मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात येतो आहे. याबाबत त्यांनी माझ्याशी काहीही चर्चा केलेली नाही. आता नव्या शेवटासह चित्रपट प्रदर्शित करत आहेत. रांझणावर लोकांचं प्रेम आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात १२ वर्षांपासून घर करुन आहे. आता मला हे कळत नाही की मला म्हणजेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विश्वासात न घेता हे काय चाललं आहे? रांझणा चित्रपटाचा शेवट सुखद होणार आहे असं मी ऐकलं. हॅपी एंडिंग काय असते? मी चित्रपटातून एक शोकांतिका मांडली होती. आता लोकांच्या भावनांशीही तुम्ही खेळ करणार आहात का? चित्रपटाचा खरा आवाज म्हणजे चित्रपटाचा शेवट आहे. तुम्ही चित्रपटाचा शेवट तुमच्याकडे हक्क स्वाधीन आहेत म्हणून एआयच्या मदतीने बदलत आहात. हे करणं म्हणजे चित्रपटाचा आत्मा बदलण्यासारखं आहे.

काही कोटींच्या कमाईसाठी…
द स्क्रीनशी चर्चा करताना दिग्दर्शक आनंद रॉय म्हणाले, काही कोटींच्या कमाईसाठी हे लोक दिग्दर्शक, लेखक आणि कलाकरांनी केलेल्या कलाकृतीशी छेडछाड करत आहेत. टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करा त्याचं स्वांगत करु. मात्र हे सगळं जे काही चाललं आहे ते धोकादायक आहे. उद्या मनात आलं तर लोक शोले चित्रपटात जय आणि विरु दोघांनाही जिवंत राहिलेलं दाखवून चित्रपटाचा क्लासमॅक्सच बदलला जाईल अशीही भीती आनंद एल रॉय यांनी बोलून दाखवली. संगीतकार ए. आर. रहमान यांनीही चकित झालेला इमोजी पोस्ट करत हा सिनेमा तमिळ भाषेत १ ऑगस्टला प्रदर्शित होईल अशी माहिती दिली आहे.
इरॉस फिल्म्स कंपनीचं म्हणणं काय?
इरॉस फिल्म्स कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप द्वीवेदी म्हणाले की इरॉसकडे चित्रपटाचे हक्क स्वाधीन आहेत. आमच्याकडे चित्रपटाचा विशेष कॉपीराइट आहे. धनुष, सोनिया कपूर तसंच इतर कलाकारांनी यासंदर्भातल्या करारावर सह्या केल्या आहेत. जो बदल आम्ही करत आहोत, ती एक सकारात्मक रचना आहे. आम्ही संपूर्ण चित्रपट बदललेला नाही फक्त शेवटचे काही प्रसंग बदलले आहेत. एआयच्या मदतीने हा बदल करण्यात आला आहे. आम्ही एआयच्या मदतीने बदल केला असला तरीही एआय हे सावधगिरीने वापरण्याचं टूल आहे. रांझणा चा शेवट बदलला आहे पण आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. मूळ संकल्पना न बदलता आम्ही हा बदल केला आहे.