Raveena Tandon Padma Shri Award : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही कायमच चर्चेत असते. ८० ते ९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतंच रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.

आज बुधवारी (५ एप्रिल २०२३) रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी ‘आरआरआर’चे संगीतकार एमएम किरावानी आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्याबरोबरच तबलावादक झाकीर हुसेन आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना अनुक्रमे पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केला गेला. हुसैन यांना यापूर्वी १९९८ मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पद्म पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी रवीनाने खास लूक केला होता. तिने यावेळी साडी, केसात गजरा आणि कानात झुमके असा लूक केला होता. या व्हिडीओत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपस्थितीत मान्यवरांना नमस्कार करताना दिसत आहे.

यानंतर रवीनाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नमस्कार केला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रवीनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि तिच्या कार्यासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला.

आणखी वाचा : “केवळ बॉलिवूडच नव्हे, तर…” पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रवीना टंडनने मानले केंद्र सरकारचे आभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रवीना टंडनने तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. “मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. माझे योगदान, माझे आयुष्य, माझी आवड आणि उद्देश ज्याने मला केवळ बॉलिवूडच नव्हे, तर त्यापलीकडेही योगदान देता आले, त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची ऋणी आहे,” असं रवीना म्हणाली होती.