Renuka Shahane on Salman Khan and Madhuri Dixit: सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये माधुरी दीक्षित, सलमान खान, रेणुका शहाणे, मोहनीश बहल हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते.

रोमँटिक आणि तितक्याच भावूक करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटातील गाणीदेखील खूपच गाजली. सलमान आणि माधुरीची जोडी लोकप्रिय ठरली. ९० च्या दशकातील सर्वांत गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून हम आपके है कौन या चित्रपटाचे नाव घेतले जाते.

रेणुका शहाणेंनी सांगितला सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव

रेणुका शहाणे यांनी या चित्रपटात पूजा ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. आता रेणुका शहाणे यांनी ऑफस्क्रीन कलाकारांमध्ये कसे बॉण्डिंग होते, यावर वक्तव्य केले. त्यांनी ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “आम्ही ऑफस्क्रीन खूप मजा केली. जेव्हा ‘वाह वाह रामजी’ गाण्यात अनुपम खेरजी लाडू खातात, त्या सगळ्या गमतीजमती झाल्या होत्या. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आहे.”

सलमान खानबद्दल रेणुका शहाणे म्हणाल्या, “सलमान खूप खोडकर होता; पण सुदैवानं तो खोड्या काढत नव्हता. मैनें प्यार किया या चित्रपटात त्यानं सूरज बडजात्यांबरोबर काम केलं होतं. त्यामुळे त्यांना एकमेकांचे स्वभाव माहीत होते. आमच्यात ऑफस्क्रीन बॉण्डिंग चांगलं असल्यानं पडद्यावर आम्हाला भावजय आणि दीर हे नातं साकारण्यास त्याची मदत झाली.”

सेटवरील वातावरण कसं होतं, या प्रश्नावर रेणुका शहाणे म्हणाल्या, “धिकताना धिकताना… या गाण्याचे शूटिंग उटीमध्ये झाले. त्या गाण्यात क्रिकेट खेळल्याचा सीनदेखील पाहायला मिळतो. रीमा लागू, अनुपम खेर आणि संपूर्ण कुटुंबच एकत्र यायचे. ज्यावेळी सेटअप बदलायचा असे. त्यावेळी आम्ही एकत्र असू आणि एखादा खेळ खेळत असू. आम्ही गोष्टी सांगायचो, तेव्हा खूप मजा यायची. सूरजजी नेहमी म्हणायचे की, आपण या चित्रपटाचे शूटिंग करीत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटाचे शूटिंगदेखील करू शकतो. कारण- खूप मराठी कलाकार सेटवर होते. सलमान अर्धा मराठी होता; तर माधुरी पूर्ण मराठी होती.”

रेणुका शहाणे यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्या नुकत्याच अयान मुखर्जीच्या ‘वॉर २मध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटात हृतिक रोशन, कियारा अडवाणी, ज्युनिअर एनटीआर हे कलाकार दिसले होते.