Renuka Shahane says married producer asked her to live with him: रेणुका शहाणे या चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी बॉलीवूडसह ‘बापमाणूस’सारख्या मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. सर्कस या टीव्ही मालिकेतील त्यांची भूमिकादेखील मोठी गाजली.
आता अभिनेत्री त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एका दिग्दर्शकाने गैरवर्तन केल्याचा प्रसंग सांगितला आहे. तसेच, ए-लिस्ट स्टार असूनही आणि चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून असलेल्या रवीना टंडनला चित्रपटाच्या सेटवर तिच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी लागली आणि सतर्क राहावे लागले, असेही रेणुका शहाणे म्हणाल्या.
विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर
करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक निर्माता त्यांच्याबरोबर काय वागला होता, याची आठवण रेणुका शहाणे यांनी सांगितली. त्यांनी नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “एक निर्माता माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्याने मला सांगितले की, तो विवाहित आहे. पुढे तो मला म्हणाला की, तुम्ही माझ्या एका साडी कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर व्हा. पुढे तो असेही म्हणाला की तू माझ्याबरोबर राहा. मी दर महिन्याला तुला पैसे देईन. हे ऐकल्यानंतर मी आणि माझी आई खूप घाबरलो होतो.”
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या की, त्याने दिलेली ऑफर आणि पैसे मी नाकारले. त्यानंतर तो तसाच प्रस्ताव घेऊन दुसऱ्या एका अभिनेत्रीकडे गेला. पण, चित्रपटसृष्टीत ही गोष्ट अनेकांसाठी सोपी नाही. ज्या अभिनेत्री अशा लोकांना नकार देतात, त्यांच्यासाठी गोष्टी आणखी कठीण केल्या जातात. कधी कधी जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रस्तावाला नकार देता, तेव्हा असे लोक बदला घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला इतरांकडूनही कामे मिळू नयेत यासाठी प्रयत्न कतात. माझ्याबरोबर असे घडलेले नाही; पण ते घडू शकते.”
जर एखाद्या पीडित अभिनेत्रीने तक्रार केली, तर तिला प्रोजेक्टमधून काढून टाकले जाते किंवा तिचा आणखी छळ केला जातो. ‘मी टू’ चळवळीबद्दल अभिनेत्री म्हणाली, “समस्या ही आहे की, मी टू चवळळीनंतरही पाच-सहा वर्षांनंतर ज्यांच्यावर आरोप झाले होते, ते सर्व काही विसरून काम करीत आहेत. जर तुम्ही कोणावर आरोप करीत असाल आणि जर पोलिस केस वगैरे झाली नसेल, तर तुम्ही तो आरोप सिद्ध करू शकला नाही म्हणून तुम्हाला त्याबद्दल विचारतात.”
रवीना टंडनदेखील सेटवर सुरक्षेबाबत काळजी घेत असे, असे वक्तव्य रेणुका शहाणे यांनी केले. त्या म्हणाल्या, “रवीना खूप मोठी हिरोईन होती. ती चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून होती. तिने मला सांगितले होते की, जेव्हा बाहेरच्या ठिकाणी शूटिंग होत असे तेव्हा ती रोज खोली बदलत असे. ती कोणत्या खोलीत आहे, हे कोणाला कळू नये, यासाठी असे केले जात असे. अनेकदा पुरुष सहकलाकार, निर्माते वगैरे रात्री अभिनेत्रींच्या खोलीचा दरावाजा वाजवत असत. त्यामुळे जरी काळजी घेतली तरी त्याचा फायदा होत नसे.”
दरम्यान, रेणुका शहाणे आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
