गलवानमध्ये शहीद झालेल्या आपल्या भारतीय सैन्याच्या जवानांचा अपमान करणाऱ्या ट्वीटमुळे रिचा सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या या ट्वीटवरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. भारतीय सैन्याचा हा अपमान सगळ्यांच्याच चांगला जिव्हारी लागला असून रिचाच्या विरोधात सगळ्यांनीच आवाज उठवला आहे. तिच्या आगामी चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणीदेखील होत आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांनी रिचाच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे.

भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते. याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचाने रिट्वीट करत, “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येण्याची रिचाची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा अशाच काही वादग्रस्त वक्तव्यामुळे रिचा चर्चेत आली होती. ‘ सीएए एनआरसी’, ‘वाघा बॉर्डरची परेड’, ‘पाकिस्तानी कलाकारांनावर घातलेली बंदी’ अशा कित्येक मुद्द्यांवर रिचाने वादग्रस्त वक्तव्य आता पुन्हा व्हायरल होऊ लागली आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण : लष्करासंदर्भातील एका ट्वीटनं राजकीय वातावरण तापलं; रिचा चड्ढासंदर्भातील नेमका वाद काय? अनेकदा अडकली वादात

‘ट्रिब्यून’मधील एका जुन्या मुलाखतीमध्ये रिचाच्या पाकिस्तान भेटीबद्दल आणि तिथे काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रिचाने स्पष्ट उत्तर दिलं. रिचा म्हणाली, “मी प्रथम माझ्या थिएटर ग्रुपबरोबर प्रथम पाकिस्तानात आले. तेव्हाचा अनुभव फारच अविस्मरणीय होता. लाहोरमधील रस्ते आणि तिथलं वातावरण, अनारकली बाजार मला प्रचंड आवडला. लोकसुद्धा खूप नम्र होती. मला असं जाणवलं की दोन्ही देशातील लोकांना शांती हवी आहे, राजकीय नेत्यांमुळे ही मंडळी गोंधळून जातात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिचाला जेव्हा पाकिस्तानी चित्रपट सृष्टीत काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने यासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट केलं. रिचा म्हणाली, “मला खरंच इथे काम करायला आवडेल, बरेच भारतीय कलाकार इथे काम करत आहेत. मलाही अशी संधी मिळाली आणि एखादी कथा मला आवडली तर नक्कीच मला काम करायला आवडेल, आणि तसं झालं तर पाकिस्तानी प्रेक्षकांनी मला स्वीकारल्याचा मला आनंदच होईल.” वादग्रस्त ट्विटप्रकरणी कित्येक ठिकाणी रिचाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिचाने यानंतर माफीदेखील मागितली, पण तिच्या माफीची दखलही फारशी कुणी घेतलेली नाही.