Saiee Manjrekar Share Her Experience : मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी व सत्या ही तीन मुलं आहेत. त्यापैकी सई मांजरेकर वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजन सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. अभिनेता सलमान खानबरोबर ‘दबंग ३’ चित्रपटातून सईने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.

आजकाल अनेक स्टारकिड्स विविध सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. ते कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्ट्समधून सतत काम करताना दिसतात. पण, सई मात्र स्वत:च्या वेगळ्या आणि संथ पद्धतीनं स्वत:चं करिअर घडवत आहे. जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर तिनं ‘अर्जुन – सन ऑफ वैजयंती’ या तेलुगू चित्रपटामधून पुनरागमन केलं आहे. या प्रवासाबद्दल तिनं नुकतीच प्रतिक्रिया दिली.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, इंडस्ट्रीमधील अभिनयाच्या प्रवासाबद्दल सई म्हणते, “या चित्रपटसृष्टीनं मला खूप काही शिकवलं आहे. कारण- इथे प्रत्येक गोष्ट बारकाईनं तपासली जाते. त्यामुळे मला लवकर प्रगल्भ होण्याऐवजी प्रत्येक वेळी आपलं सर्वोत्तम देण्याची सवय लागली. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण, आता त्या गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात.”

पुढे ती म्हणते, “काही वेळ जाऊ द्या; पण शांतपणे व विचारपूर्वक पावलं टाका, असं मला वाटतं. सतत शिकत राहणं महत्त्वाचं आहे आणि सातत्य ठेवलं की, कारकीर्द आपोआप घडते. इथे यश पटकन मिळत नाही. त्यामुळे संयम गरजेचा असतो.”

सई ‘मेजर’ व ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटांमध्येही झळकली आहे. तिच्या चित्रपटांमध्ये दोन वर्षांचा कालावधी आहे. मोठ्या ब्रेकनंतर चित्रपटात काम करण्याबद्दल ती म्हणते, “प्रत्येक चित्रपटाची ऑफर स्वीकारण्याऐवजी, काही निवडक आणि अर्थपूर्ण प्रोजेक्ट्स करणं मला जास्त योग्य वाटतं. सगळ्यांची आवड-निवड ही वेगळी असते. मला गुणवत्ता महत्त्वाची वाटते. हळूहळू, पण योग्य पावलं टाकली तर टिकून राहता येतं, असं माझं मत आहे.”

त्यानंतर सईनं स्पर्धेपासून दूर राहणं कधी असुरक्षित वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं, “माझ्या मते, ही निवड वैयक्तिक असते. आपल्याला आपला मार्ग कसा पाहिजे? त्यावर सगळं अवलंबून असतं. मला संथ व सुसंगत प्रवासाची जास्त आवड आहे”. दरम्यान, सईच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या ती ‘इंडिया हाऊस’ या आगामी तेलुगू चित्रपटाचं शूटिंग करीत आहे.