Salman Khan Bajrangi Bhaijaan Jai Shri Ram Scene : सलमान खानच्या करिअरमधील काही महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘बजरंगी भाईजान.’ काही वर्षांपूर्वी आलेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातल्या अबोल पण गोड मुन्नी व सलमानच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली होती.
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सलमान खानने एका हिंदू व्यक्तीची भूमिका केली आहे, जो एका लहान मुस्लीम मुलीला सुरक्षितपणे पाकिस्तानात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. या प्रवासादरम्यान त्याला अनेक लोक भेटतात आणि यातून त्याला मानवता हाच खरा धर्म असल्याचं कळतं, अशी या सिनेमाची कथा आहे.
या सिनेमातील एका सीनमध्ये ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी (मौलवी) सलमानला ‘जय श्रीराम’ म्हणत निरोप देतात. सेन्सॉर बोर्डने हा संवाद काढून टाकण्यास सांगितलं होतं असं चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्वत: सांगितलं होतं. मुस्लीम प्रेक्षकांना हे खटकू शकतं असं त्यांचं म्हणणं होतं. पण, दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक हा सीन ठेवला होता.
याबद्दल दिग्दर्शक कबीर म्हणाले, “मी त्यांना विचारलं ‘माझं नाव काय आहे? कबीर… मीही एक मुस्लीम आहे; पण मला याचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मी हा सीन मुद्दामहून ठेवला. दिल्लीमध्ये असताना मी पाहिलं आहे की ‘जय श्रीराम’ हे एक राजकीय घोषवाक्य नव्हतं, तर ते एक अभिवादन होतं. ‘नमस्कार’ किंवा ‘नमस्ते’सारखं… मग ते लोकांना का खटकावं?”
यापुढे कबीर यांनी याबद्दलची एक आठवण सांगत असं म्हटलं, “ईदच्या दिवशी जेव्हा मी ‘बजरंगी भाईजान’चा शो चित्रपटगृहात पाहिला, तेव्हा अनेक मुस्लिमांनी चित्रपटात मौलवी ‘जय श्रीराम’ म्हणताना टाळ्या वाजवल्या होत्या. ते दृश्य आठवून आजही अंगावर शहारे येतात.”
यापुढे कबीर म्हणाले, “तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणत होतं की, मुस्लीम लोकांना हे आवडणार नाही. पण मला वाटतं की, तुम्ही स्वतःच्या श्रद्धेवर ठाम राहायला हवं. जर एखादी गोष्ट चांगुलपणाने करता तेव्हा ती लोकांना नक्कीच आवडते.” दरम्यान, The Indian Express च्या Expresso या कार्यक्रमात कबीर बेदी यांनी ‘बजरंगी भाईजान’बद्दलची ही आठवण शेअर केली.