बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी (१४ एप्रिल ) पहाटे पाच वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यानंतर पुढच्या ४८ तासांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विकी गुप्ता आणि सागर पाल अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली. या दोन दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींसह नेतेमंडळींनी गॅलेक्सीवर जाऊन सलमानची भेट घेतली, त्याची विचारपूस केली. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी देखील सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सलमानच्या घरावर हल्ला झाल्यावर याची संपूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. लॉरेन्सच्या भावाने फेसबुक पोस्ट शेअर करत हा फक्त ट्रेलर होता असं म्हणत अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशातच आता विवेक ओबेरॉयचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान आणि विवेकमध्ये झालेले वाद आता सर्वश्रूत आहेत. त्यामुळेच हा जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये विवेक बिश्नोई समाजाचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”

विवेकचा हा व्हिडीओ गेली अनेक वर्षे जुना आहे. सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात अभिनेता म्हणतोय, “संपूर्ण जगात बिश्नोई हा एकमेव समाज आहे जिथे हरणाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलांना बिश्नोई माता जवळ घेऊन दूध पाजतात व त्याचं संगोपन करतात. हरणांच्या मुलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करून त्यांना पुढे वाढवतात.” भाईजानचे चाहते विवेकच्या या जुन्या व्हिडीओवर प्रचंड नाराज झाले आहेत. सलमानवर हल्ला करणाऱ्या बिश्नोई समाजाचं कौतुक केल्याने त्याच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत विवेकला ट्रोल केलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगत विवेकला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : “सरकार त्याच्या पाठीशी”, सलमान खानची भेट घेतल्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री? अभिनेत्याला दिलं आश्वासन

लॉरेन्स बिश्नोई गँग सलमानच्या मागे का लागलीये? नेमकं प्रकरण काय?

सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली आहे. लॉरेन्स हा पंजाबमधल्या फाजिल्का येथील गुन्हेगारी विश्वातला मोठा गुंड आहे. याने सलमानला धमकी देण्याचं कारण म्हणजे काळवीट शिकार प्रकरण. सप्टेंबर १९९८ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान सलमानने काळविटाची शिकार केली होती. यासाठी त्याला शिक्षा देखील झाली परंतु, त्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला. बिश्नोई समाजात काळवीट पूजनीय आहे. याच शिकारी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सलमानला वारंवार धमकी देण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमानची भेट घेऊन त्याला संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलं. तसेच आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.