बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी ( १४ एप्रिल ) पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयित आरोपींना सोमवारी रात्री गुजरातमधून अटक केली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटी आणि नेते मंडळींनी गॅलेक्सी अपार्टमेंला जाऊन सलमानची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूचना करत सलमानची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली होती. अशातच मुंबई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यावर आता मुख्यमंत्र्यांनी सलमानच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेली आहे. अभिनेत्याची भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा : Salman Khan House Firing : सलमानच्या घराची रेकी करणाऱ्या संशयितांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

सलमानशी झालेली भेट आणि गोळीबार प्रकरणाबद्दल सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “सलमानची मी नुकतीच भेट घेतली. ही आमची सदिच्छा भेट होती. त्याच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपींना मुंबई पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे. सोमवारी गुजरातमधील भुजमधून विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे बिहारचे रहिवासी आहेत. सध्या पोलीस या दोघांची चौकशी करत असून त्यांना २५ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.”

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर

“चौकशीनंतर संपूर्ण सत्य आपल्यासमोर येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त व मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यामागे नेमकं कोण आहे? त्याचा शोध घेऊन पोलीस कठोर कारवाई करतील. यापुढे अशाप्रकारची हिंमत कोणीही करू नये अशी जरब पोलीस त्यांच्यावर बसवतील. याचबरोबर सलमान खानसह त्याच्या नातेवाईकांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सलमानची भेट घेऊन मी घडल्याप्रकारबद्दल त्याला दिलासा दिला. सरकार सलमानच्या पूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे. त्यांची सुरक्षा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. याशिवाय पुन्हा असं धाडस कोणीही करू नये याची सर्व काळजी सरकार घेईल. त्या गँगला पोलिसांच्या मदतीने आम्ही संपवून टाकू” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. सलमानच्या घराबाहेर या दोन आरोपींनी पाच फायर राऊंड केल्याचं त्यांनी सांगितलं.