This Bollywood Actor was Deeply in Love with Hema Malini : कलाविश्वात काम करण्यासाठी जितकं कलागुण संपूर्ण असणं म्हत्त्वाचं असतं तितकचं काही वेळा तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणंसुद्धा गरजेचं असतं असं म्हटलं जातं. आपल्याकडे असे काही अभिनेते आहेत ज्यांनी ९०चा काळ गाजवला, परंतु असेही काही कलाकार आहेत जे कधी फार प्रसिद्धीझोतात आले नाही. परंतु, त्यांच्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यातीलच एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते संजीव कुमार.
संजीव कुमार हे एका गुजराती कुटुंबातून येतात. त्यांच्याकडे अभिनयाचा कोणताही वारसा नव्हता. परंतु, तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या बळावर बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत काम केलं. संजीव यांना दिलीप कुमार, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांच्याइतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी त्यांनी ‘खिलोना’, ‘आंधी’, ‘मौसम’, ‘नमकीन’, ‘कोशीश’, ‘अनामिका’ यांसारख्या चित्रपटांत काम करत त्यांच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली.
संजीव कुमार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असायचे. त्यांच्या खासगी आयुष्यातील अभिनेत्रींबरोबरच्या नात्याबद्दल ते चर्चेत असायचे; परंतु अभिनेत्री हेमा मालिनीबरोबरच्या नात्याबद्दल त्याकाळी अधिक चर्चा झाली. संजीव कुमार हेमा मालिनी यांच्यासह रिलेशनशिपमध्ये होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार हेमा मालिनी व संजीव कुमार यांची प्रेमकहाणी त्याकाळी खूप गाजली होती. १९७२ मध्ये ‘सीता और गीता’ चित्रपटाच्या सेटवर हेमा व संजीव यांच्यामध्ये जवळीक वाढली. संजीव यांनी हेमा मालिनींना त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं.
संजीव कुमार यांनी अभिनेत्रीसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम न करण्याच्या त्यांच्या अटीमुळे हेमा मालिनींनी संजीव यांच्याबरोबरचं नातं संपवलं. त्यावेळी हेमा मालिनींबरोबरचं नातं तुटल्यानंतर संजीव कुमार खूप दुःखात होते. त्यानंतर हेमा मालिनी यांच्या व्यतिरिक्त ते इतर काही अभिनेत्रींबरोबरही रिलेशनशिपमध्ये होते, परंतु त्यांनी कधीच कोणाशी लग्न केलं नाही.
हेमा मालिनी यांच्या व्यतिरिक्त संजीव कुमार अभिनेत्री शबाना आझमी यांनादेखील बराच काळापासून ओळखत असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमधून सांगितलं होतं. परंतु, त्यांच्या आईला मुस्लीम सून नको असल्याने शबाना आझमी व त्यांचं नातं पुढे गेलं नाही. विजया इराणी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संजीव कुमार यांनी शबाना आझमी यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
हेमा मालिनी व शबाना आझमी यांच्याव्यतिरिक्त संजीव कुमार यांचं नाव अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्याबरोबरही जोडलं गेलेलं. सुलक्षणा पंडित संजीव कुमार यांच्या प्रेमात होत्या, परंतु त्यावेळी संजीव हेमा मालिनींच्या प्रेमात असल्याने त्यांनी सुलक्षणा यांना नकार दिलेला. एवढंच काय तर सुलक्षणा यांनी संजीव यांना लग्नाची मागणी घातल्याचंही अभिनेत्यानी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. परंतु, त्यांचं सुलक्षणा यांच्यावर प्रेम नसल्याने त्यांनी अभिनेत्रीसह लग्न करण्यास नकार दिल्याचं म्हटलं जातं.
संजीव कुमार यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया या केवळ त्यांच्याकडे असलेल्या पैशामुळे येत आहेत अशी भीती होती. संजीव कुमार यांनी अनेक अभिनेत्रींना डेट केलं, परंतु त्यांनी कधीही कोणावरही विश्वास ठेवला नाही. त्यांची जवळची मैत्रीण व अभिनेत्री अंजू महेंद्रू यांनी एका मुलाखतीमध्ये संजीव कुमार यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “मला कधी कळलंच नाही तो स्त्रियांच्या प्रेमात असायचा की स्त्रियाच त्याच्या प्रेमात असायच्या; पण त्यावेळी अनेकदा बऱ्याच महिला त्याच्या आजूबाजूला असायच्या. तो दिसायला देखणा असल्याने अनेक जणी त्याच्या प्रेमात होत्या, परंतु त्याला कायम असंच वाटायचं की त्या त्याच्या प्रेमात नसून त्याच्याकडे असलेल्या संपत्तीसाठी त्याच्याबरोबर नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहेत”.