बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनी या चित्रपटात कर्नल लुथ्राची भूमिका साकारली आहे. नुकतंच रेणुका शहाणेंनी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पठाण चित्रपटात अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहे. त्याबरोबरच या चित्रपटात अभिनेता आशुतोष राणा यांनी कर्नल लुथ्राची भूमिका साकारली आहे. नुकतंच रेणुका शहाणे या त्यांचे पती आशुतोष यांच्याबरोबर पठाण पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी रेणुका शहाणे यांनी पतीबरोबरचा एक फोटो शेअर केला. "अखेरीस मी कर्नल लुथ्राबरोबर पठाण चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. सध्या वातावरण एकदम ठीक आहे. खुर्चीही नीट बांधलेली आहे", असे रेणुका शहाणेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर शाहरुख खानने रेणुका शहाणेच्या ट्वीटला रिट्वीट केले आहे. त्यावर तो म्हणाला, "कर्नल लुथ्रा यांना सांगितलंय का की तुम्ही माझ्या पहिल्या अभिनेत्री आहात…? की आपल्याला ही गोष्ट गुपित ठेवायला हवी, नाही तर ते मला त्यांच्या एजेन्सीमधून बाहेर काढतील." यानंतर रेणुका शहाणेंनीही याला उत्तर दिले आहे. "त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. तुम्ही त्याला अंतर्यामी म्हटले आहे आणि काहीही झालं तरी ते तुम्हाला काढून टाकू शकत नाही. कारण तुम्ही जे काम करता ते दुसरे कोणीही करू शकत नाही", असे रेणुका शहाणेंनी म्हटले आहे. या सर्व संभाषणावर रेणुका शहाणेंचे पती आशुतोष राणांनीही ट्वीट केले आहे. काळाबरोबर माणसांचे वय वाढते, तू तुझ्या कामात आणखीनच काटेकोर झाला. पण सध्या चिंता तर लुथराला आहे. कारण तो पुढच्या मिशनमध्ये कायम राहील की नाही, अशी भीती त्याला आहे. कारण शेवटच्या सीनमध्ये तुम्ही लुथराला म्हटलं होतं की, तलवार पण पठाणची आणि नियमही पठाणचे, असे आशुतोष राणा यांनी ट्वीट करत म्हटले आहे. दरम्यान रेणुका शहाणे, शाहरुख खान आणि आशुतोष राणा यांचे हे ट्वीट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या संवादाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ‘पठाण’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम रचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाने भारतात ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते ‘पठाण’ने आता जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर, देशात ५०० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १२व्या दिवसापर्यंत इतकी कमाई केली आहे.