शाहरुखा खानला बुधवारी ( २२ मे ) उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या किंग खानवर अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचार चालू आहेत. शाहरुखची भेट घेण्यासाठी जुही चावला व तिचे पती रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर अभिनेत्रीने किंग खानच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. यानंतर आता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
पूजा ददलानीने एक्स ( आधीचे ट्विटर ) पोस्ट शेअर करत शाहरुखच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे. किंग खानला २२ मे रोजी उष्माघातामुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होत होता. हॉटेलवर करण्यात आलेल्या प्राथमिक उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्याला रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.
हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी’मधून सलमान खानचा पत्ता कट? होस्ट म्हणून ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा, पाहा प्रोमो
आता यासंदर्भात पूजा ददलानी पोस्ट शेअर करत लिहिते, “मिस्टर खान यांचे सगळे चाहते आणि हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थना, प्रेम आणि काळजीबद्दल मनापासून धन्यवाद!”
अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असून, त्याला रात्रभर निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. शाहरुख खान रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी पसरताच रुग्णालयाभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. शाहरुखची पत्नी गौरी खान, त्याची जवळची मैत्रीण जुही चावला आणि तिचे पती जय मेहता यांनी त्याची रुग्णालयात भेट घेतली होती. यानंतर ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना जुहीने शाहरुख लवकरच बरा होऊन केकेआरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येईल असं सांगितलं होतं.
To all of Mr Khan’s fans and well wishers – he is doing well. Thank you for your love, prayers and concern ?
— Pooja Dadlani (@pooja_dadlani) May 23, 2024
दरम्यान, “शाहरुख खानवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे,” अशी माहिती अहमदाबाद (ग्रामीण) पोलीस अधीक्षक ओम प्रकाश जाट यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहमदाबाद शहरात अनुक्रमे ४५.२ आणि ४५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं होतं. यामुळे अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागला होता.