बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या मोठ्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा आगामी चित्रपट ‘देवा.’ ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने फिटनेसबरोबरच त्याच्या अनोख्या हेअरस्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘जब वी मेट’ अभिनेत्याने आजवर ‘विवाह’, ‘कबीर सिंग’, ‘आर राजकुमार’, ‘पाठशाला’, ‘मौसम’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’, ‘हैदर’ अशा विविध चित्रपटांत काम करून तो एक हरहुन्नरी अभिनेता आहे हे दाखवून दिलं आहे. अभिनयासह शाहिद नेहमीच त्याच्या लूकमध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीच्या अनेक रोमँटिक चित्रपटात त्याने मोठे केस आणि सुंदर हेअरस्टाइल ठेवली होती. मात्र, पुढे ‘हैदर’मध्ये त्याने टक्कल करून प्रेक्षकांना चकित केले.

आता पुन्हा एकदा त्याने त्याचे केस बारीक केले आहेत. शाहिद त्याच्या फिटनेससह चित्रपटांसाठी केसांवरही वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो आहे. समोर असलेल्या पात्रानुसार आपला संपूर्ण लूक बदलण्यासाठी तो कधीच मागेपुढे पाहत नाही. नुकतीच त्याने या विषयावर ‘एएनआय’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने पुन्हा एकदा बदललेल्या लूकबद्दल भाष्य केलं.

त्याग करणे शिकले पाहिजे…

“प्रत्येक कलाकाराने अशा गोष्टींचा त्याग करणे शिकले पाहिजे, ज्या त्यांच्या जास्त जवळच्या आहेत. ज्या भौतिक सुखावर मी अवलंबून होतो, त्याच्यापासून दूर गेल्याने मला एक अभिनेता म्हणून आणखी विकसीत होता आले”, असं शाहिदने यावेळी सांगितलं.

केस माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग…

शाहिदने पुढे सांगितलं की, “मला वाटतं की, केस नेहमीच माझ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग राहिले आहेत. सुरुवातीला माझे केस मोठे होते, त्यावेळी माझा लूकसुद्धा एका साध्या मुलाप्रमाणे होता. एक अभिनेता म्हणून मला वाटतं की, मी त्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, ज्या गोष्टी मला फार जास्त जवळच्या वाटतात.”

आत्मविश्वास कसा वाढतो?

शाहिदने पुढे सांगितलं की, “मला माझे डोळे, माझे केस फार आवडतात. प्रत्येक कलाकाराने त्याचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या एका गोष्टीचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला समजते की, तुमचा आत्मविश्वास या छोट्या गोष्टींमधून निर्माण होत नाही; त्यामुळेच मला वाटतं ‘हायडर’ चित्रपट माझ्या जीवनाला एक वेगळं वळण देणारा चित्रपट होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केस बारीक करताना कधी मनात कोणती भीती आली का? असा प्रश्न शाहिदला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने थेट लहान मुलांच्या टक्कलशी त्याची तुलना केली. तो म्हणाला की, “लहान मुलांचे टक्कल केले जाते तेव्हा कोणीच विचार करत नाही, केस पुन्हा येतील की नाही. मला वाटतं, केस कापल्याने किंवा टक्कल केल्याने केस आणखी जास्त दाट येतात. त्यामुळे केस कापताना किंवा टक्कल करताना मला कधीच असे काही वाटले नाही.”