९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते, अनिल कपूर व बोनी कपूर यांचे भाऊ संजय कपूर आपल्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ओळखले जातात. अलीकडच्या काळात त्यांनी ‘मिशन मंगल,’ ‘ब्लडी डॅडी,’ ‘मेरी ख्रिसमस,’ ‘लस्ट स्टोरीज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये व सीरिजमध्ये काम केलं आहे. कपूर कुटुंबातील सोनम, जान्हवी, खुशी व अर्जुन कपूरनंतर आता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनायाच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘आँखों की गुस्ताखियां’ असं आहे.
‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात शनायबरोबर अभिनेता विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘आँखों की गुस्ताखियां’ हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. रविवारी (१८ मे राजी) या चित्रपटाचा टीझर विक्रांत मॅसीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या टीझर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शनाया कपूर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
‘आँखों की गुस्ताखियां’ हा तिचा पहिलाच चित्रपट असल्याने चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताना पाहून तिला आनंदाश्रू आले. या कार्यक्रमात विक्रांतने शनायाबद्दलही वक्तव्य केलं. “शनायाचा हा पहिलाच चित्रपट आहे त्यामुळे ती भारावली आहे. पण मला तुझ्याबरोबर काम करताना खूप मजा आली आणि यापुढे ही तुझ्याबरोबर काम करायला आवडेल,” असं विक्रांत शनायाला म्हणाला.
‘आँखों की गुस्ताखियां’ हा एक रोमँटिक चित्रपट असून विक्रांत मॅसी व शनाया कपूर ही फ्रेश जोडी यामधून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष सिंह यांनी ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी या चित्रपटाची रीलिज डेट जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान, शनाया कपूरबद्दल बोलायचं झालं तर ती बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांची पुतणी आहे. तर सोनम कपूर, जान्हवी कपूर, खूशी कपूर यांच्या पाठोपाठ आता शनाया कपूरही अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. शनायाचा हा पहिला सिनेमा असला तरी यापूर्वी तिने म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. त्या व्हिडीओतील डान्समुळे तिला ट्रोल करण्यात आलं. या गाण्यात शनायाबरोबर लोकप्रिय पंजाबी गायक गुरु रंधावा होता.