शर्मिला टागोर या ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतीच त्यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा ‘अरण्येर दिन रात्रि’ हा चित्रपट दाखविण्यात आला होता. सत्यजित रे दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्यासह सौमित्र चॅटर्जी, शुभेंदू चॅटर्जी, समित भांजा, रबी घोष, शर्मिला टागोर, काबेरी बोस, सिमी गरेवाल व अपर्णा सेन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
शर्मिला टागोर यांनी आजवर अनेक दिग्गज कलाकारांसह काम केलं आहे. त्यातीलच एक म्हणजे दिवंगत अभिनेते संजीव कुमार. शर्मिला टागोर व संजीव कुमार यांनी ‘मौसम’, ‘फरार’, ‘सत्यकाम’, ‘गृह प्रवेश’ व ‘चरित्रहीन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. शर्मिला यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये संजीव कुमार यांच्याबद्दलचा एक किस्सादेखील सांगितला होता. संजीव कुमार यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “संजीव कुमार माझे आवडते अभिनेते होते. आम्ही तेव्हा डबल शिफ्टमध्ये काम करायचो. सकाळी मी त्यांच्यासह ‘फरार’मध्ये काम करत असे आणि संध्याकाळी ‘मौसम’ चित्रपटासाठी काम करायचे. त्यामध्ये मी वेश्येची भूमिका साकारत होते.”
पुढे त्या म्हणाल्या, “तेव्हा माझा चित्रीकरणाचा पहिलाच दिवस होता. मी खूप उत्सुक होते. आमची २ ते १० ची शिफ्ट होती आणि २ च्या शॉटसाठी मी तयार होते. पण, संजीव कुमार त्या दिवशी ८ वाजता आले. उशिरा आल्यामुळे मी त्यांच्यावर प्रचंड रागावले. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं; पण मी त्यांच्याबरोबर बोललेच नाही. नंतर मी त्यांचा ‘आंधी’ हा चित्रपट पाहिला त्यातील त्यांचं काम मला खूप आवडलं तेव्हा मी त्यांची भेट घेऊन, त्यांच्या कामासाठी त्यांचं कौतुक केलं आणि मी त्यांना माफ केलं. मग आम्ही बोलायला लागलो.”
दरम्यान, शर्मिला टागोर यांनी शेवटचं ‘गुलमोहर’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यापूर्वी त्यांनी ‘ब्रेक के बाद’, ‘लाइफ गोज ऑन’, ‘मॉर्निंग वॉक’, ‘धडकन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शर्मिला यांनी ९० च्या काळात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्या काळी त्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. आजही अनेक जण आवडीने त्यांचे चित्रपट पाहताना दिसतात.