Shilpa Shetty बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांच्या अडचणींमध्ये पुन्हा भर पडली आहे. मुंबईतल्या व्यावसायिकाची ६० कोटींना फसवणूक केल्याच्या आरोपात या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनीही आपली ६० कोटींची फसवणूक केली आहे अशी तक्रार या व्यावसायिकाने केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. १० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
नेमकं हे प्रकरण काय?
दीपक कोठारी या मुंबईतील व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची भेट घेतली होती. राजेश आर्या नावाच्या माणसाने ही भेट घडवून आणली होती. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. बेस्ट डील टीव्ही हे होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म होता. तक्रारीनुसार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ७५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज १२ टक्के व्याजदरावर घेण्यात आलं होतं. या कर्जातून व्याज वाचावं म्हणून राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांनी कंपनीत आपण ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे असं दाखवलं. तक्रारदार दीपक कोठारी यांच्या तक्रारीनुसार दर महिन्याला कर्जाची रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात परत करण्याचं आश्वासन शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनीही दिलं होतं. मात्र या दोघांनीही हे आश्वासन पाळलं नाही असा आरोप दीपक कोठारींनी केला आहे. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी फसवतील असं वाटलं नव्हतं-दीपक कोठारी
शिल्पा शेट्टी या प्रकरणात जो ७५ कोटींच्या कर्जाचा व्यवहार झाला त्याची साक्षीदार होती. मात्र २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात शिल्पाने तिचं संचालक पद सोडलं. दीपक कोठारींच्या म्हणण्यानुसार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघंही आपले पैसे बुडवतील किंवा आर्थिक गैरव्यवहार करतील याची कल्पना सुरुवातीला आली नाही. मात्र नंतर त्यांना ही कल्पना आली ज्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. दरम्यान ज्या कंपनीसाठी व्यवहार करण्यात आला ती कंपनीही आता बंद झाली आहे. २०१५ ते २०२३ या कालावधीत आम्ही आमचा व्यवसाय वाढवू आणि तुमचे पैसे चुकते करु असं आश्वासन शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पूर्ण केलं नाही असं दीपक कोठारी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.