‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट उद्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शनामध्ये पदार्पण करीत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याचं दिग्दर्शन असलेल्या पहिल्याच चित्रपटात त्याला दिग्गज कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली आहे. नाटक, मालिकांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

अशातच शिवराजने नुकतंच एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे. ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शिवराजला ‘तुझ्या आयुष्यातील आता थांबायचं नाय ही मुमेंट कोणती’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला आहे.

त्याने म्हटलं आहे की, “मी पुण्यात नाटक करत होतो. मी, विराजस कुलकर्णी आमचा एक ग्रुप होता. तेव्हा भरत जाधव सर व केदार शिंदे सर यांनी “ढॅंन टे डॅन” या मराठी नाटकासाठी विचारलं होतं. एक महिन्यासाठी त्याची रिहर्सल मुंबईत असणार होती आणि तेव्हा पुण्यात माझ्या नाटकांचे चांगले प्रयोग सुरू होते.पण, विराजसने मला अक्षरशा ओरडून सांगितलं की, गपचूप बॅग उचलायची, राहायचा वगैरे विचार करू नको माझ्या घरी राहायला यायचं आणि तिथून प्रॅक्टिसला जायचं.

पुढे याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी हो म्हटलं आणि मुंबईत रहायला लागलो त्यानंतर मी पहिल्यांदा भरत सरांबरोबर स्टेजवर उभा होतो तेव्हा खूप भारी वाटलं की आपण ज्यांना लहानपणापासून बघत आलो आहोत, आज त्यांच्याबरोबर काम करत आहोत ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर वाचन केलं तेव्हा घरी जाऊन विराजसला म्हटलं की, मला इथपर्यंत खेचून आणलंस त्यासाठी धन्यवाद… आणि तेव्हा मला असं वाटलं की आता मी थांबणार नाही”.

“आता थांबायचं नाय” हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्रदिनी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हणमगर यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट कामगारांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे, तर अभिनेते भरत जाधव बऱ्याच दिवसांनी या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता-दिग्दर्शक शिवराज वायचळने यापूर्वी ‘गोंद्या आला रे’, ‘बनमस्का’, यांसारख्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे; तर यापूर्वी त्याने पुण्यात असताना काही नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं.