एका बॉलीवूड अभिनेत्रीने तब्बल ३० वर्षे पतीचा अत्याचार सहन केला होता. पदरात मुलगा असल्याने घरगुती हिंसाचार सहन करून तिने ३० वर्षे पतीबरोबर काढली. या अभिनेत्रीचं नाव रती अग्निहोत्री. ‘कुली’ व ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटांमध्ये काम करून रतीला लोकप्रियता मिळाली. तिने १९८५ साली आर्किटेक अनिल विरवानीशी लग्न केलं होतं. सुखी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या रतीच्या नशिबी मात्र अत्याचार आला.

रती अग्निहोती पतीबरोबर वरळीत राहत होती. लग्नानंतर पती तिला मारहाण करू लागला. तिने ३० वर्षे पतीचा अत्याचार सहन केला असा खुलासा एका मुलाखतीत केला होता. पती मारहाण करायचा, पण रती मात्र खोट्या हास्यामागे हा अत्याचार लपवत राहिली.

लग्नानंतर वर्षभराने मुलाचा जन्म

रती अग्निहोत्रीने सांगितलेलं की ती दोन कारणांमुळे लग्न टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. पहिलं म्हणजे तिचा लग्न या पवित्र संकल्पनेवर खूप विश्वास होता आणि दुसरा म्हणजे लग्नाच्या फक्त एक वर्षानंतर १९८६ मध्ये तिला मुलगा झाला. त्याचं नाव तनुज विरवानी. मुलगा प्रायोरिटी असल्याने सगळं सहन केलं, असं रतीने द टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

पती बदलेल, चांगला वागेल या आशेवर रती दिवस ढकलतहोती. “कधीकधी मी स्वतःला म्हणायचे की मला इतकं हसायची गरज नाही. पण मी कधीच हसले नाही,” असं रती म्हणाली. ७ मार्च २०१५ रोजी मुलगा तनुज चित्रपटाच्या शूटिंगसाठी पुण्यात होता, त्यावेळी अशी घटना घडली की रती व तिच्या पतीच्या नात्यातली सगळी समीकरणं बदलली.

…अन् रतीने पोलिसांत घेतली धाव

रतीच्या मते, त्यादिवशी तिचा पती प्रचंड संतापला होता. ती लाकडी दरवाज्यामागे लपली होती. “मला वाटलं मी ५४ वर्षांची आहे. दिवसेंदिवस वय वाढेल व मी कमकुवत होत जाईल. आणि एकेदिवशी तो मला मारून टाकेन,” असं त्या घटनेबद्दल रती म्हणाली होती. त्या घटनेनंतर तिने पोलिसांत धाव घेतली आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली.

ज्या घरात रती अनेक वर्षे राहिली, त्या घरी तिने पुन्हा पाऊल ठेवलं नाही. ती लोणावळ्यातील तिच्या बंगल्यावर निघून गेली. रतीचा मुलगा तनुजला याबद्दल समजलं, त्याने आईची बाजू घेतली. तो तिच्याबरोबर लोणावळ्यात राहू लागला. काही वर्षांनी तनुजने आई-वडिलांचं नातं सुधारण्याचा प्रयत्न केला. तनुजने २ वर्षांपूर्वी लोणावळ्यात लग्न केलं. त्याच्या लग्नात त्याचे आई-वडील दोघेही उपस्थित होते. आताही रती व तिचे पती बरेचदा मुलगा तनुज व त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतात.

रती अग्निहोत्री आता काय करते?

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, रती अग्निहोत्री आता जास्तीत जास्त वेळ पोलंडमध्ये घालवतेय. ती व तिची बहीण अनिता यांचं एक रेस्टॉरंट आहे. रतीचा मुलगा तनुज अभिनेता आहे.