Sholey @50 : शोले हा हिंदी चित्रपट सृष्टीतला एक अजरामर चित्रपट आहे. १५ ऑगस्ट १९७५ ही अशी तारीख आहे ज्या दिवशी शोले हा हिंदी चित्रपट सृष्टीतला मैलाचा दगड ठरलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ५० वर्षांनी रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच सर्वाधिक मानधन कुणी घेतलं होतं ही आठवणही सांगितली आहे. शोले हा चित्रपट असा आहे जो मागच्या पाच दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. एखाद्या चित्रपटाचं गारुड म्हणजे काय ते शोलेने फक्त दाखवून दिलेलं नाही तर सिद्ध केलं आहे.
१ कोटीचं बजेट पण सिनेमा तयार व्हायला लागले ३ कोटी
शोले या चित्रपटाचं बजेट १ कोटी इतकं होतं. मात्र चित्रपट तयार होईपर्यंत हे बजेट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढलं होतं असं रमेश सिप्पी यांनी सांगितलं. यानंतर रमेश सिप्पींना प्रश्न विचारण्यात आला की या चित्रपटात कुठल्या कलाकाराला जास्त मानधन मिळालं होतं? चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान, ए. के. हंगल, विजू खोटे, मॅक मोहन, जगदीप, असरानी यांच्या भूमिका होत्या. विशेष बाब म्हणजे शोलेतली या कलाकारांची नावं आणि त्यातले डायलॉग आजही लोकांच्या स्मरणात आहेत. सलीम जावेद यांची जबरदस्त कथा. जी. पी. सिप्पी यांचं दिग्दर्शन, आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि कलाकारांची जमून आलेली भट्टी या सगळ्या बाजू शोलेसाठी जमेच्या ठरल्या यात शंकाच नाही.
शोलेतला जास्त मानधन घेणारा कलाकार कोण?
रमेश सिप्पी यांनी ५० वर्षांनी शोलेतला सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार कोण हे सांगितलं आहे. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि ते म्हणजे धर्मेंद्र. धर्मेंद्र यांनी चित्रपटात विरु हे पात्र साकारलं होतं. रमेश सिप्पी म्हणाले की धर्मेंद्र त्या काळातले सुपरस्टार होते. त्यामुळे त्यांनी सर्वाधिक मानधन घेतलं होतं.
शोलेची बॉक्स ऑफिसची कमाई ३५ कोटी
कलाकारांच्या मानधनासह तीन कोटीत तयार झालेल्या शोलेने त्या काळात बॉक्स ऑफिसवर ३५ कोटींची कमाई केली होती. ही कमाई त्या काळातली सर्वाधिक कमाई होती. १९६० मध्ये आलेल्या मुगल ए आझम या चित्रपटाने १० कोटी ८० लाख रुपये कमाई केली होती. हा रेकॉर्ड शोले चित्रपटाने मोडला होता. पुढची १५ वर्षे शोलेच्या नावावर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा रेकॉर्ड कायम होता अशी आठवणही रमेश सिप्पींनी सांगितली. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रमेश सिप्पींनी ही आठवण सांगितली.