Shweta Tiwari on Palak Tiwari Dating : मनोरंजन विश्वात कलाकारांच्या डेटिंगच्या अनेक अफवा पसरत असतात. एखादे कलाकार कोणत्याही ठिकाणी एकत्र स्पॉट झाले की, त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण येतं. अशीच कायम चर्चेत असलेली जोडी म्हणजे, अभिनेत्री पलक तिवारी आणि अभिनेता इब्राहिम खान.
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांचं नातं गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत राहिलं आहे. दोघांना अनेकदा पार्टी, सिनेमांच्या स्क्रीनिंग्स किंवा काही इव्हेंट्समध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबतच्या अफवा होताना दिसतात.
पलक आणि इब्राहिमच्या डेटिंगच्या अफवांवर आता श्वेता तिवारीने प्रतिक्रिया दिली आहे. Bollywood Life च्या वृत्तानुसार, श्वेता तिवारीने Galatta India दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “प्रत्येक दुसऱ्या मुलाशी पलकचं नाव जोडलं जातं. तिच्याबद्दल लोक खूप वाईट पद्धतीने लिहितात. म्हणून मला भीती वाटते. अजून ती लहान आहे. कधी, कुठे काही चुकीचं लिहिलं गेलं, तर तिला त्रास होईल का? ती किती दिवस हे सगळं सहन करेल? याची मला काळजी वाटत राहते.”
पुढे श्वेता म्हणाली की, आई म्हणून तिला पलकबद्दल सतत चिंता वाटत असते. ती म्हणाली, “पलक खूप निरागस आहे. दिसायला ती खंबीर दिसते; पण खरंतर ती तशी नाही. लोक काहीही बोलतात, ट्रोल करतात. पण तिला त्याचं उत्तर द्यावं असं वाटत नाही. मीसुद्धा पलककडूनच ट्रोल्सकडे दुर्लक्ष कसं करावं हे शिकलेय,”
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पलकच्या नावाशी इब्राहिम खानचं नाव अनेकदा जोडलं गेलं. मात्र यावर श्वेताचं उत्तर खूप मजेशीर होतं. याबद्दल श्वेता म्हणते, “पलक मला कधी म्हणते, ‘आई, आता मी याला डेट करतेय.’ तर मी विचारते, ‘अरे, हे केव्हा झालं? कधी भेटलीसही नाहीस त्याला!’ हे सगळं इतकं गंमतीत होतं की, मलाच काही कळत नाही. पलक मजेत हे सांगते, पण कधी कधी हे त्रासदायक वाटतं.”
श्वेता तिवारी इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, इब्राहिम अन् पलकला अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. एकदा ते मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेले असल्याचंही म्हटलं जातं. याआधी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत पलक म्हणाली होती की, तिच्या खासगी आयुष्याबद्दल अफवा पसरवल्या जातात आणि लोक कायम तिचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्यात उत्सुक असतात.