रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. रणबीर, रश्मिका अन् बॉबीसह या चित्रपटातील तृप्ती डीमरीचीही चांगलीच चर्चा आहे. शिवाय यामध्ये रणबीरच्या मेव्हण्याची भूमिका निभावणाऱ्या सिद्धांत कर्णिकचं काम लोकांना पसंत पडलं आहे.

आणखी वाचा : आता मोबाइलवर खेळता येणार ‘GTA – Vice city’; ९० च्या दशकातील पिढीला नेटफ्लिक्सकडून जबरदस्त सरप्राइज

नुकतंच सिद्धांतने चित्रपटावर होणाऱ्या टिकेवर भाष्य केलं आहे. गेली २० वर्षे सिद्धांत मनोरंजनक्षेत्रात कार्यरत आहे पण त्याला खरी ओळख ‘अ‍ॅनिमल’मुळेच मिळाली आहे. या चित्रपटानंतर लोकांचा सिद्धांतकडे पाहायचा दृष्टिकोनही बदलल्याचं त्याने स्पष्ट केलं. ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधतांना त्याने चित्रपटावर होणाऱ्या टिकेवरही अत्यंत परखडपणे भाष्य केलं आहे.

सिद्धांत म्हणाला, “मी एक असा चित्रपट बनवेन जो मनोरंजक आहे आणि आपल्या विषयाशी प्रामाणिक आहे, अन् त्याचवेळी मी पब्लिक सर्विस अनाउंसमेंट अंतर्गत एक जाहिरात करेन ज्यामधून समाजात कसं वावरायचं याबद्दल प्रबोध केलं जाईल. जर मी या विषयावर चित्रपट केला तर तो चित्रपटगृहात तीन दिवसही टिकणार नाही. ज्यांना या समाजप्रबोधन करणाऱ्या जाहिराती पहायच्या असतात त्यांनी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याआधी यायला हवं अन् अक्षय कुमारला सॅनीटरी पॅडबद्दल प्रबोधन करताना पाहायला हवं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सिद्धांत म्हणाला, “त्या लोकांनी धूम्रपानाचे दुष्परिणाम जाणून घ्यायला हवेत अन् हे दुष्परिणाम ‘अ‍ॅनिमल’मध्ये दाखवलेल्या हिंसाचारापेक्षा भयानक आहेत. तुम्ही मनोरंजनासाठी पैसे देऊन तिकीट काढून चित्रपट पाहायला येता. मला एक गोष्ट कळून चुकली आहे की तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. ज्यांना माझा चित्रपट आक्षेपहार्य वाटतो त्यांनी अक्षय कुमारची पब्लिक सर्विस जाहिरात पहावी. आम्हा कलाकारांचं कामच आहे तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करणं. आज लोक माझ्या चित्रपटाबद्दल चर्चा करत आहेत. माझं काम पूर्ण झालं आहे, आता लोक त्याचं कौतुक करोत की निंदा याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही.”