Bollywood Singer On Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी २२ मार्च २०२५ रोजी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला. ज्यात त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले होते. तसंच या प्रकरणात रिया चक्रवर्तीलाही क्लिन चिट देण्यात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याबद्दलच्या अनेक चर्चा झाल्या होत्या.

अशातच आता प्रसिद्ध गायकाने अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल वक्तव्य केलं आहे. गायक आणि संगीतकार अमाल मलिकने बॉलीवूड इंडस्ट्रीतील वातावरणामुळे सुशांतला आपला जीव गमवावा लागल्याचं म्हटलं आहे. तसंच याआधी सुशांतबरोबर जे केलं गेलं. ते आता कार्तिक आर्यनबरोबर निर्माते आणि दिग्दर्शक करत असल्याचं त्याने म्हटलं. ‘मिरची प्लस’शी बोलताना अमालने हे म्हटलं आहे.

याबद्दल अमाल म्हणाला, “या इंडस्ट्रीबद्दल आता जनतेला समजलं आहे… इथे इतकं भीषण वातावरण आहे की, लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. सुशांत सिंह राजपूतही ते सहन करू शकला नाही. त्याच्याबरोबर जे काही घडलं… आता काही जण त्याला खून म्हणतात किंवा काही जण त्याला आत्महत्या म्हणतात. ते काहीही असो… पण तो माणूस तर निघून गेला ना…”

यापुढे अमाल म्हणतो, “या इंडस्ट्रीने त्याच्या मनावर काहीतरी परिणाम केला किंवा लोकांनी त्याचं खच्चीकरण केलं. जेव्हा ती गोष्ट समोर आली; तेव्हा अगदी सामान्य माणसाला बॉलीवूडचं खरं रूप कळलं आणि त्यांना या इंडस्ट्रीबद्दल तिरस्कार वाटू लागला. इंडस्ट्रीची अशी अवस्था कधी झाली नव्हती, पण सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने या लोकांचं सर्वस्व हिरावून घेतलं.”

यानंतर अमाल म्हणाला, “एका चांगल्या माणसाबरोबर खूप चुकीचं झालं. आज हेच सगळं कार्तिक आर्यनबरोबरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होत आहे. पण तो या सगळ्या समस्यांना आनंदाने सामोरा जात आहे. कार्तिकला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याची आई, वडील आणि अनेकजण त्याच्याबरोबर आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे अमाल म्हणतो, “कार्तिक आर्यन नुकताच या इंडस्ट्रीत आला आहे आणि तो स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही लोक त्याला या इंडस्ट्रीतून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मोठमोठे निर्माते आणि कलाकार हे असं काहीतरी करत असतात.”