बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजवर अनेक चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्येष्ठ अभिनेते, शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असूनही सोनाक्षीने आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोनाक्षी सिन्हा गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. मात्र प्रेक्षकांना अजूनही तिच्या अभिनयाची खरी ताकद पाहायला मिळालेली नाही, असं तिच्या भावाचं म्हणणं आहे. सोनाक्षी सिन्हाचा भाऊ आणि दिग्दर्शक कुश सिन्हाने नुकत्याच एका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली.

The Free Press Journal ला दिलेल्या मुलाखतीत कुशने सांगितले की, सोनाक्षीच्या क्षमतेला साजेशी भूमिका किंवा योग्य चित्रपट अजूनही मिळाले नाहीत. याबद्दल तो म्हणतो, “मी केवळ तिचा भाऊ म्हणून नाही, तर एक प्रेक्षक म्हणूनही मला नेहमीच वाटायचं की, तिची या क्षेत्रात काम करण्याची क्षमता वापरली गेली नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. बरेचदा दिग्दर्शक कलाकारांना त्यांच्या मर्यादेपलीकडे नेण्यास संकोच करतात. पण मी ‘लूटेरा, ‘अकीरा’ आणि ‘दबंग’सारख्या चित्रपटांत तिचं काम पाहिलं आहे आणि मला माहित होतं की, तिच्यात खूप उत्तम अभिनयक्षमता आहे.”

यापुढे त्याने कलाकारांना योग्य भूमिका का मिळत नाहीत? याबद्दल असं म्हटलं की, “कधीकधी कलाकार जे निर्णय घेतात; ते त्यांच्यासाठी योग्य ठरत नाहीत. संहिता (स्क्रिप्ट) ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर चांगलं वाटतं, पण ते प्रत्यक्ष चित्रीकरणात तितकंसं जमेलच असं नाही. काही वेळा अपेक्षेपेक्षा उत्तम होतं, तर काही वेळा तसं होत नाही. एखादा चित्रपट यशस्वी नाही झाला, तर त्यासाठी केवळ कलाकार जबाबदार असतो असं नाही. स्क्रिप्टवरून स्क्रीनपर्यंतचा प्रवास खूपच अनिश्चित असतो. यात नशिबाचाही भाग असतो.”

यापुढे त्याने सिन्हा कुटुंबाचा भाग असल्याबद्दल काम करताना दबाव येतो का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. याबद्दल कुश म्हणाला, “वडिलांनी सिनेमा आणि राजकारणात जे यश मिळवलं आहे, ते थक्क करणारं आहे. खूप कमी लोकांना दोन्ही क्षेत्रात यश मिळतं. मला सोनाक्षीचा अभिमान आहे, तिच्या प्रवासाचा आदर आहे. पण माझा दिग्दर्शक म्हणून एक वेगळा प्रवास आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते म्हणजे जबाबदारीने काम करणं आणि ते योग्यरित्या पार पाडणं.”