बॉलीवूडमधील कायम चर्चेत राहणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल. सोशल मीडियावर दोघे एकमेकांबरोबरचे अनेक प्रँक व्हिडीओ शेअर करीत असतात. तसंच त्यांना ट्रोल करणाऱ्या ट्रॉलर्सच्या घेतलेल्या समाचारामुळेसुद्धा दोघांच्या नावांची चर्चा होताना दिसते. अशातच पुन्हा झहीरनं केलेल्या एका वक्तव्याने ते चर्चेत आले आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी गेल्या वर्षी अचानक लग्नाची घोषणा केली. दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा करताच काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांच्यावर काही नेटकऱ्यांकडून टीका करण्यात आली होती. यात अनेकदा नेटकऱ्यांनी सोनाक्षीच्या धर्मांतराचासुद्धा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, सोनाक्षी आणि झहीर यांनी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून ते खूप सकारात्मकपणे हाताळलं.

अशातच सोनाक्षीनं नुकत्याच शेअर केलेल्या एका व्लॉग व्हिडीओमध्ये झहीरनं तिच्या धर्मांतराबाबत टिप्पणी केली आहे. सोनाक्षी-झहीर नुकतेच अबु धाबीला गेले होते, ज्याचा व्लॉग व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यात त्यांनी एका मस्जिदला भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल व्लॉगमध्ये सोनाक्षी म्हणाली, “आज आम्ही अबु धाबीमध्ये आहोत आणि आमची ही ट्रिप खूप खास असणार आहे. अबु धाबी टुरिझमने आम्हाला शहर बघायला आमंत्रित केलं आहे.”

यानंतर ती व्हिडीओत सांगते की, “आम्ही आधुनिक काळातील प्रसिद्ध ‘शेख झायेद ग्रँड मस्जिद’मध्ये जाणार आहोत आणि या मशिदीत जण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे, कारण मस्जिदमध्ये जाण्याची ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ आहे. मी पूर्वी मंदिर आणि चर्चमध्ये गेले आहे, पण मस्जिदमध्ये कधीही गेले नव्हते.” यावर झहीरनं लगेच एक मजेदार टिप्पणी केली की, “मी फक्त हे स्पष्ट करू इच्छितो की, मी तिला इथं धर्मांतर करण्यासाठी घेऊन जात नाहीय. आम्ही फक्त ती मस्जिद पाहायला जात आहोत, कारण ती खूप सुंदर आहे.”

याच धर्मांतराच्या मुद्द्यावर सोनाक्षीनं यापूर्वीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ती म्हणालेली, “आम्ही कधीच आमच्यातील धर्माचा विचार केला नाही. तो माझ्यावर त्याचा धर्म लादत नाही आणि मी त्याच्यावर माझा धर्म लादत नाही. आम्ही कधीही धर्माबद्दल चर्चा केली नाही. आम्ही कायम एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो. आमचं लग्न स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत केलं आहे, ज्यामध्ये मी एक हिंदू स्त्री म्हणून धर्म न बदलता लग्न करू शकते आणि तो एक मुस्लीम पुरुष म्हणून आपला धर्म कायम ठेऊ शकतो.”

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी जून २०२४ मध्ये सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं. त्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत मोजके कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत लग्न केलं.