आपल्या मधूर आवाजाने गायक सोनू निगमने अनेकांची मने जिंकली आहेत. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी त्याने गायलेली गाणी सुपरहिट ठरली आहेत. सोनू निगमचा एखाद्या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम असल्यास चाहते तेथे मोठी गर्दी करतात. त्याच्या गोड गळ्यातील काही मधूर स्वर कानी पडावेत म्हणून ते कार्यक्रमांना हजर राहतात. अशात नुकताचा त्याचा एक लाईव्ह शो पुण्यात पार पडला. या शोदरम्यान सोनू निगमची तब्येत काहीशी बिघडली होती.

गायक सोनू निगमच्या पाठीत असह्य वेदना होत होत्या. मात्र, तरीही आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील गाणी ऐकण्याची उत्सुकता आणि आनंद पाहता त्याने शो बंद केला नाही. काही वेळ वैद्यकीय उपचार घेतल्यावर त्याने लगेचच मंचावर येऊन आपल्या आवाजाची साऱ्यांना भूरळ घातली. सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा या कार्यक्रमातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच नेमकं काय घडलं होतं याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनू निगम एका ठिकाणी उभा आहे. त्याला पाठीत असह्य वेदना होत आहेत. त्यानंतर हात आणि पाय स्ट्रेच करून तो थोडा व्यायाम करतो आणि बॉडी रिलॅक्स करतो. व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरून त्याला किती वेदना होतायत हे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सोनू निगम म्हणाला की, “माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवसांपैकी हा एक दिवस होता. पण, समाधानकारक होता. माझ्या पाठीत चमक भरली होती. गाणं गात असताना पाय झटकल्याने मला बरं वाटेल असं वाटलं, मात्र तसं झालं नाही. पाठीत भरलेली चमक थेट पाठीच्या मणक्यापर्यंत पोहचली. कोणीतरी माझ्या पाठीच्या मणक्याला सुईने टोचत आहे असं मला वाटू लागलं. हा त्रास फार जास्त वेदना देणारा होता.”

“मात्र, यामुळे मला माझी वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांना नाराज करायचे नव्हते, त्यामुळे स्टेजवर जाऊन मी गाणं गाण्यास सुरुवात केली. शेवटी सर्वकाही छान पार पडले”, असंही सोनू निगमने पुढे सांगितलं आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने यावर “काल सरस्वतींनी माझा हात पकडला होता”, असं कॅप्शन लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू निगमने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही कलाकारांसह संगीत क्षेत्रातील काही व्यक्तींनी सोनू निगमला आरोग्याची काळजी घे, असं कमेंट करत सांगितलं आहे. सोनू निगमने आजवर गायलेल्या गाण्यांपैकी ‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘संदेसे आते है’, ‘पापा मेरी जान’, ‘अभी मुझ में कही’, ‘कभी खुशी कभी गम’ ही गाणी तुफान गाजली आहेत.