विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बनत असलेल्या एका चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेता रणदीप हुड्डा याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. या टीझरमध्ये सावरकर यांचे विचार आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग याचं चित्रण पाहायला मिळत आहे. पण यातील काही गोष्टींवर मात्र आक्षेप घ्यायला सुरुवात झालेली आहे.

या चित्रपटाचा टीझर शेअर करताना वीर सावरकर हे नेताजी सुभाषचंद्र बॉस, खुदीराम बोस आणि भगत सिंग यांचे प्रेरणास्रोत असल्याचं म्हंटलं गेलं. रणदीप हुड्डाने त्याच्या ट्वीटमध्येही असंच लिहिलं होतं. आता सुभाषचंद्र बोस यांचे पणतु चंद्र कुमार बोस यांनी यावार आक्षेप घेतला असून सुभाषबाबू हे सावरकरांचे विरोधक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इंडिया टूडेच्या रीपोर्टनुसार चंद्र कुमार बोस म्हणाले, “नेताजी सुभाषचंद्र बोस हे दोघांकडूनच प्रेरणा घेत असत. एक म्हणजे त्यांचे आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद आणि दुसरे म्हणजे त्यांचे राजकीय सल्लागार चित्तरंजन दास. या दोघांशिवाय नेताजी इतर कुणाला आपला प्रेरणास्रोत मानत असतील असं मला तरी वाटत नाही. सावरकर एक महान क्रांतिकारी होते यात काहीच शंका नाही, पण नेताजी आणि सावरकर यांची विचारधारा पूर्णपणे वेगळी होती. वास्तविक पाहता नेताजी यांनी सावरकरांचा विरोधही केला होता.”

याबद्दल बोलताना सुभाषचंद्र बोस यांनीच लिहून ठेवलेल्या काही व्यक्तव्याबद्दल सांगताना चंद्र कुमार म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यात सावरकर किंवा मुहम्मद अली जिना यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नका असं नेताजी यांनीच लिहून ठेवलं आहे. त्यांनी हिंदू महासभेकडूनही कसलीच अपेक्षा ठेवू नका असं लिहिलेलं. नेताजी सेक्युलर होते, सांप्रदायिक लोकांच्या ते कायम विरोध करायचे. त्यामुळे नेताजी यांनी सावरकरांचा मार्ग स्वीकारला होता असं तुम्ही कसं म्हणू शकता?” इतकंच नव्हे तर सेल्युलर जेलमध्ये गेल्यावर सावरकर यांच्यात बरेच बदल झाले असाही दावा चंद्र कुमार यांनी केला आहे.

आणखी वाचा : “गांधीजी वाईट नव्हते, पण…” रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणदीप हुड्डाच्या ट्वीटबद्दल भाष्य करताना ते म्हणाले, “रणदीप यांचा दावा अत्यंत चुकीचा आहे. चुकीचा इतिहास मांडणं हा देशाच्या युवा पिढीशी केलेला मोठा धोका आहे. नेताजी, भगत सिंह और खुदीराम बोस हे सावरकरांच्या विचारधारेचं समर्थन करायचे हे म्हणणं अगदी चूक आहे. चित्रपटनिर्माते काही तरी वादग्रस्त दाखवून प्रसिद्धी मिळवू पहात आहेत, पण यासाठी खोटा इतिहास सादर करणं हा गुन्हा आहे.” रणदीप हुड्डाने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.