बॉलीवूडबरोबर हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या दोन दशकांच्या करिअरमध्ये बऱ्याचदा वादांमुळेही चर्चत राहिली होती. त्यातलं एक प्रकरण म्हणजे तिचं व अक्षय कुमारचं अफेअर. त्यांनी सलग तीन वर्षे ‘अंदाज’, ‘ऐतराज’ आणि ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
अक्षय व प्रियांका ‘बरसात’ मध्ये एकत्र काम करणार होते आणि त्यासाठी त्यांनी एक गाणंही शूट केलं होतं, असा खुलासा दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी केला आहे. अक्षय व प्रियांका यांच्यात अफेअर असल्याची चर्चा अक्षयची पत्नी ट्विंकलपर्यंत पोहोचली आणि अक्षयने सिनेमा करण्यास नकार दिला.
अक्षय कुमारने सेटवर बोलावलं अन्…
सुनील व अक्षय कुमारने सात चित्रपट एकत्र केले, पण अचानक काम करणं का थांबवलं, असा प्रश्न त्यांना विकी लालवानीने विचारला. सुनील उत्तर देत म्हणाले, “प्रियांका व अक्षय वेगळे होण्यापूर्वी त्यांच्यावर एक खूप सुंदर गाणं शूट करण्यात आलं होतं. सिनेमाच्या फायनल शेड्यूलचं शूटिंग सुरू होणार होतं, याचदरम्यान अक्षयने मला त्याच्या सिनेमाच्या सेटवर बोलावलं. मला आश्चर्य वाटलं होतं, कारण तो मला सेटवर बोलवायचा नाही. त्यावेळी तो मला म्हणाला की काही अशा गोष्टी आहेत ज्या त्याच्या नियंत्रणात नाहीत आणि त्याचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याने मला चित्रपटाबद्दल पुढे निर्णय घ्यायला सांगितलं. मला त्याचे नेमके शब्द आठवत नाहीत, पण त्याने मला प्रियांका किंवा त्याच्यापैकी एकाला सिनेमात घेण्याचा पर्याय सुचवला.”
दीड वर्षे वाट पाहिली, अक्षयने नकार दिला
अक्षयने हा पर्याय का सुचवला? असं विचारल्यावर सुनील म्हणाले, “प्रियांका चोप्राबरोबर काम करण्याची अक्षयची इच्छा नव्हती असं नाही. पण परिस्थिती एका अशा टप्प्यावर पोहोचली होती की लोक व माध्यमं त्यांच्या नात्याबद्दल बोलू लागले होते. याबद्दल अक्षयची पत्नी ट्विंकलला समजलं होतं. मी अक्षयची तब्बल दीड वर्षे वाट पाहिली, पण अचानक त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. हे ऐकून मला धक्का बसला. त्याने माझ्याबरोबर पुढचा चित्रपट करेल, असं म्हटलं होतं पण त्याच्या नकारानंतर मला त्यावर विश्वास नव्हता.”
अक्षयच्या कथित अफेअरची बातमी कळताच ट्विंकलने त्याला सोडून दिलं होतं, असं सुनील दर्शन म्हणाले होते. “अक्षयने काही चुका केल्या होत्या. नंतर प्रियांका चोप्रा व अक्षय कुमारबद्दल अफवा पसरू लागल्या आणि ट्विंकलने त्याचे घर सोडले. एक अभिनेता म्हणून तुम्हाला जबाबदारीने वागावं लागतं. जर तुमची पत्नी अभिनेत्री आहे, तर तिला इंडस्ट्रीबद्दल सर्व काही माहित आहे. कारण तिने अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केलं आहे. त्यामुळे तिला सगळं माहित होतं,” असं फ्रायडे टॉकीजला दिलेल्या मुलाखतीत सुनील यांनी सांगितलं होतं.