Suniel Shetty Comment On Marriages : बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विनोदी, तसंच काही गंभीर भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आजोबांची भूमिका पार पडत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा सुनील शेट्टी अनेकदा त्याच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांनी सुद्धा चर्चेत येत असतो.
अभिनेता सुनील शेट्टीने दिलेल्या एका मुलाखतीत विवाह आणि पालकत्त्वाविषयी व्यक्त केलेल्या मतांमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे. Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत “लग्न म्हणजे काय, हेच मला आता समजत नाही. आजकालच्या मुलांमध्ये अजिबात संयम नाही. लग्नानंतर एकमेकांना समजून घ्यावं लागतं, एकमेकांसाठी जगावं लागतं. नंतर मूल होतं आणि बायकोने समजून घ्यायला हवं की, जर नवरा बाहेर कामाला जात असेल तर, मुलांची जबाबदारी मी घेईन. अर्थातच नवराही यात मदत करेल. पण आजकाल सगळ्याच गोष्टींमध्ये खूप दबाव असतो, कारण सल्ला देणारे लोक खूप झाले आहेत.” असं म्हटलं होतं.
त्यांच्या या विधानांवर सोशल मीडियावर टीका होत आहे. अनेकांनी त्यांच्या विचारांना जुनाट, स्त्रीद्वेषी विचारसरणीचं उदाहरण म्हटलं आहे. सुनील शेट्टीने केलेल्या वक्तव्याबद्दल Reddit वर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. नेटकऱ्यांनी सुनील शेट्टीबद्दल “काय अपेक्षा करता? तो आपल्या पिढीचा नाही, तो ६५ वर्षांचा आहे, तो आजी-आजोबांच्या पिढीचा आहे”, “हा नेहमीचाच स्त्रीद्वेषी विचारांचा वाटतो” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महिलांनीच मुलं सांभाळावीत – ही कल्पना चुकीची का आहे? याबद्दल Mindtalk या संस्थेच्या नेहा पराशर आणि मानसोपचारतज्ज्ञ असं सांगतात की, “महिलांनीच मुलं सांभाळावीत. ही अपेक्षा समाजात खोलवर रुजलेल्या लैंगिक भूमिकांवर आधारित आहे. जिथे घर सांभाळणं हे स्त्रीचं ‘स्वाभाविक’ काम मानलं जातं आणि करिअर करणं हे पुरुषाचं. ही भूमिका दोघांच्याही निर्णयस्वातंत्र्यावर मर्यादा आणते. मग ती कुटुंबातली जबाबदारी असो किंवा स्वतःचं करिअर करणं असो.”
याबद्दल त्या पुढे सांगतात, “या विचारसरणीमुळे आई होणं हे एक ‘कर्तव्य’ वाटू लागतं, निवड नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये अपराधी भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्या महिलांना स्वतःचं करिअर घडवायचं असतं. तसेच, पुरुषांवर एकट्याने घर चालवण्याची जबाबदारी टाकली जाते, ज्यामुळे त्यांना मुलांशी भावनिक नातं निर्माण करण्यापासून वंचित रहावं लागू शकतं.”
आधुनिक जोडप्यांनी त्यांचं पालकत्त्व समतोलपणे कसं वाटून घ्यावं? याबद्दल नेहा पराशर असं म्हणतात, “सर्वात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की, मुलं सांभाळणं ही फक्त एकाची जबाबदारी नाही. पालकत्व हे एक कौशल्य आहे. त्यामुळे ते दोन्ही जोडीदारांनी समजून घेणं गरजेचं आहे. मुल होण्याच्या आधीच दोघांनी एकमेकांच्या अपेक्षा, मूल्य आणि मदतीची साधनं यावर स्पष्टपणे संवाद साधला पाहिजे.”
नेहा पराशर असं म्हणतात, “आजकाल लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये दोघेही नोकरी करणारे आहेत. त्यामुळे दोघांमधील नियोजन खूप महत्त्वाचं आहे. केवळ वेळेच्या आधारावर काम वाटून न घेता, दोघांच्याही मानसिक क्षमतेचा, करिअरमधल्या टप्प्यांचा आणि भविष्याचा विचार करून जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – दोघांनीही एकमेकांना थकलो, चुकलो असं मान्य करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं.”