Suniel Shetty Reaction on Paresh Rawal entry : प्रेक्षकांचा आवडता बॉलीवूड चित्रपट ‘फिर हेरा फेरी’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सर्वांचे लाडके व आवडते बाबू भैया यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं होतं.

चित्रपटातील मुख्य अभिनेता तसेच निर्माता अक्षय कुमारने परेश यांच्यावर २५ कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याचंही वृत्त आलं होतं. मात्र, नंतर हे सगळे वाद मिटले आणि परेश ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा सहभागी झाले आहेत. या सगळ्याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीने नुकतीच त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, “परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यातील वाद मिटून, ते एकत्र येणं गरजेचं होतं. कारण- परेश अक्षयचा आणि अक्षयही परेश यांचा, असे दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. त्यावेळी मी त्यांना, “तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोला. संवाद साधा. बाहेरच्यांना तुमच्यात फूट पाडू देऊ नका”, असं सांगितलं होतं. विशेष म्हणजे या काळात अक्षय किंवा परेश – कोणीच एकमेकांबद्दल काही वाईट बोललं नाही.”

परेश रावल आणि अक्षय कुमार दोघे अतिशय चांगले मित्र : सुनील शेट्टी

पुढे तो म्हणाला, “परेश हे कधीही अक्षयविरोधात काहीही बोलले नाहीत. तसेच एका कार्यक्रमात जेव्हा पत्रकारानं परेश यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अक्षयनं त्याला थांबवत, ‘अशी भाषा वापरू नका’, असं म्हटलं. त्या दिवशी आम्हाला समजलं की, हे दोघं किती खरे आणि चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीमध्ये तिसऱ्याला जागा नाही.”

दरम्यान, अक्षय-परेश यांच्यातील मतभेद मिटण्यामागे अहमद खान आणि साजिद नाडियादवाला यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका होती, अशी माहिती नंतर समोर आली. ‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी काही गैरसमज मिटवून, मैत्रीचा धागा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय, सुनील व परेश – हे त्रिकूट अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात मैत्री आणि विश्वासाचं नातं आहे. अशातच आता हे त्रिकूट पुन्हा एकदा त्यांची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहेत. अनेकांना त्यांच्या ‘हेरा फेरी ३’ची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘हेरा फेरी ३’बरोबरच सुनील शेट्टी ‘हंटर’ या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.