Sanjay Kapur Property Dispute : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती व व्यावसायिक संजय कपूर यांचं जून महिन्यात निधन झालं. पोलो खेळत असताना त्यांच्या घशात मधमाशी अडकली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं. निधनानंतर त्यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरून कुटुंबात वाद सुरू आहेत.
संजय कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबात कायदेशीर वाद सुरू झाला आहे. मंगळवारी (९ सप्टेंबर) अशी बातमी समोर आली की, करिश्मा कपूरची दोन्ही मुलं – समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून, त्यांच्या वडिलांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीत हक्क मागितला आहे.
समायरा आणि कियान यांनी त्यांच्या सावत्र आई प्रिया सचदेववर वडिलांच्या मृत्युपत्रात बदल केल्याचा आरोपही केला आहे. यापूर्वी संजय यांच्या आईनेही काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता संजय यांची बहीण मंदिरा यांनी सांगितले आहे की, त्यांच्या आईला खोलीत बंद करून, जबरदस्तीने काही कागदपत्रांवर त्यांच्याकडून सह्या करवून घेण्यात आल्या.
संजय कपूर यांची बहीण मंदिरा यांनी आरोप केलाय की, त्यांच्या भावाच्या निधनानंतर त्यांच्या आई राणी कपूर यांना प्रिया सचदेव आणि इतर काही लोकांनी खोलीत बंद करून ठेवले आणि काही कायदेशीर कागदपत्रांवर त्यांना सह्या करायला लावल्या.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, CNN News18 शी बोलताना मंदिरा यांनी सांगितले, “मी तिथे होते, दारावर ठोठावत होते; पण काय चाललंय ते कळत नव्हतं. दारं बंद होती हे मला आईनं सांगितलं. तिला काय चाललंय याची कल्पना नव्हती. मी तिच्याशी बोलले, तर तिनं सांगितलं की, ‘मी काहीतरी साईन केलंय. मला सांगितलं म्हणून केलं; पण नेमकं काय साईन केलं ते माहीत नाही’. त्यानंतर आम्ही सतत शोध घेत आहोत की, आईनं नेमकं काय साईन केलं; पण अजूनही आम्हाला उत्तरं मिळालेली नाहीत.”
त्यानंतर मंदिरा म्हणाल्या, “आज माझ्या आईकडून सगळं हिसकावून घेतलं जातंय हे मी पाहतेय. आमचं लहानपणापासून शिक्षणच असं होतं की, आईची काळजी घ्यायची. त्यात तिची ही अवस्था बघून वाईट वाटतंय. हे सगळं फारच वेदनादायी आहे.” या विषयावर मंदिरा याआधीही काही मुलाखतींमध्ये बोलल्या आहेत. मात्र, प्रिया सचदेव किंवा करिश्मा कपूर यांनी अजूनपर्यंत यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
दरम्यान, संजय कपूर यांनी त्यांच्या काही महिन्यांपूर्वीच्या एका मुलाखतीतून कुटुंबाच्या भविष्यासाठी बऱ्याच गोष्टीचं नियोजन केलं असल्याचं सांगितलं होतं. मुलांच्या भविष्याचं जवळपास १० वर्षांचं नियोजन त्यांनी केलं होतं. त्यांना अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांच्या निधनानंतरही कुटुंबानं एकमेकांबरोबर प्रेमानं राहावं, अशी इच्छा संजय कपूर यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून कुटुंबात वाद निर्माण होत आहेत.