Kamal Haasan Thug Life Movie : काही दिवसांपासून अभिनेते कमल हासन हे त्यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या विधानाविरुद्ध काही गटांनी निषेध केला आणि या निषेधानंतर कर्नाटकात कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. कमल हासन यांनी ‘कन्नड ही भाषा तामिळ भाषेतून जन्माला आली असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा परिणाम त्यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटावर झाला.
यानंतर जोपर्यंत कमल हासन त्यांच्या विधानाबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार नाही, असा इशारा कर्नाटक फिल्म चेंबर्सने दिला. मात्र, यानंतरही कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला फटकारले आहे. मंगळवारी (१७ जानेवारी) न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
तसंच सरकारला बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले. याबद्दल न्यायालयाने असं म्हटलं, “राज्यात कायदा आणि न्यायव्यवस्थेचा धाक असला पाहिजे. जर कोणी काही विधानं केली असतील तर त्याचा प्रतिवाद विधानानेच व्हावा किंवा कोणीतरी काही लिहिले असेल तर त्याचा प्रतिववाद लिखाणानेच केला पाहिजे.”
चित्रपटाचे प्रदर्शन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे : सर्वोच्च न्यायालय
यापुढे न्यायालयाने असं म्हटलं, “कायद्याच्या नियमानुसार सीबीएफसी प्रमाणपत्र असलेल्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. प्रेक्षक कदाचित तो चित्रपट पाहणार नाहीत, पण लोकांनी चित्रपट पाहावाच असा आग्रह करता येणार नाही, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित व्हावा.”
तसंच कमल हासन यांच्या माफी मागण्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली. याबद्दल न्यायमूर्ती भुयान म्हणाले, “हा उच्च न्यायालयाचा विषय नाही.” दरम्यान, कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण, त्यांच्या कन्नड भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला आणि याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर झाला.
Sacnilk नुसार चित्रपटाने आतापर्यंत एकूण ४७.०४ रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या बजेटनुसार ही वाईट कामगिरी असल्याचं म्हटलं जात आहे. मणिरत्नम हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नायकन’ नंतर कमल हासन आणि मणिरत्नम यांचा हा दुसरा चित्रपट आहे.